पंजाबमध्ये ईडीची मोठी कारवाई

मुख्यमंत्री कार्यालयाशी संबंधितांवर धाड

    दिनांक :07-May-2026
Total Views |
चंदिगढ,
Big ED action in Punjab पंजाबमध्ये मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने मुख्यमंत्री कार्यालयाशी संबंधित व्यक्तींवर मोठी कारवाई केली असून, अनेक ठिकाणी धाडसत्र राबवण्यात आले आहे. या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मोहाली आणि चंदीगड परिसरातील काही ठिकाणी छापे टाकण्यात आले. यामध्ये मुख्यमंत्री कार्यालयाशी संबंधित अधिकाऱ्यांच्या निकटवर्तीयांवर तपासाची कारवाई करण्यात आली. खरार परिसरातील एका उंच इमारतीत धाड टाकण्यात आल्यानंतर खळबळ उडाली. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कारवाईची माहिती मिळताच इमारतीच्या वरच्या मजल्यावरून दोन बॅगा खाली फेकण्यात आल्या. त्यामधून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळून आली.
 
 
Punjab
 
तपास यंत्रणांनी घटनास्थळी पसरलेल्या नोटा ताब्यात घेतल्या असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.दरम्यान, एका गृहनिर्माण प्रकल्पाशी संबंधित परवानग्या मिळवताना मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. काही बांधकाम व्यावसायिकांनी नियमांचे उल्लंघन करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणात अनेक ठिकाणी शोधमोहीम सुरू असून, संबंधित कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. मुख्यमंत्री कार्यालयाशी संबंधित काही व्यक्तींवर बांधकाम व्यावसायिकांना राजकीय संरक्षण दिल्याचे आरोपही करण्यात आले आहेत.