बर्ड फ्ल्यूचा वाढता धोका तीन पोल्ट्री फार्म पॉझिटिव्ह

    दिनांक :07-May-2026
Total Views |
नंदुरबार
bird flu Nandurbar नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर परिसरात बर्ड फ्ल्यूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाची चिंता अधिकच वाढली आहे. यापूर्वी काही पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्ल्यूची लागण आढळल्यानंतर मोठ्या प्रमाणावर कलिंग ऑपरेशन राबविण्यात आले होते. आता आणखी तीन पोल्ट्री फार्मचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने पुन्हा तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत.
 

bird flu Nandurbar 
भोपाळ येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या संशयित नमुन्यांच्या अहवालात नवापूरमधील आणखी तीन पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्ल्यूची पुष्टी झाली आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून संबंधित परिसरात मोठ्या प्रमाणावर कलिंग ऑपरेशन राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पॉझिटिव्ह आढळलेल्या फार्ममधील कोंबड्यांचे कलिंग 8 मेपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
यापूर्वी नवापूर परिसरातील तीन पोल्ट्री फार्मचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एकूण नऊ पोल्ट्री फार्ममधील सुमारे दोन लाख 47 हजार कोंबड्यांचे कलिंग करण्यात आले होते. तसेच संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी तब्बल नऊ लाख 27 हजार 922 अंडी नष्ट करण्यात आली होती. याशिवाय 28.63 मेट्रिक टन पशुखाद्य देखील नष्ट करण्यात आले आहे.बर्ड फ्ल्यूचा संसर्ग वाढत असल्यामुळे प्रशासनाने प्रभावित परिसरात निर्बंध अधिक कडक केले आहेत. पोल्ट्री फार्म परिसरात ये-जा मर्यादित करण्यात आली असून पशुसंवर्धन विभागाच्या पथकांकडून सातत्याने तपासणी आणि सर्वेक्षण सुरू आहे. स्थानिक नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून कोणत्याही प्रकारचे मृत पक्षी अथवा संशयास्पद हालचाली आढळल्यास तातडीने प्रशासनाला माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, बर्ड फ्ल्यूच्या bird flu Nandurbar  पार्श्वभूमीवर पोल्ट्री व्यवसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सततच्या कलिंगमुळे मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत असल्याची भावना पोल्ट्री व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाने मात्र परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे.नवापूर परिसरातील वाढत्या बर्ड फ्ल्यूच्या घटनांमुळे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली असून पुढील काही दिवस परिस्थिती नियंत्रणात ठेवणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान असणार आहे.