तिवस्यात मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ

    दिनांक :07-May-2026
Total Views |
एकाच रात्री अनेक घरांवर डल्ला
 
तिवसा,
तिवसा शहरातील शिवनगरी परिसरात गुरुवारी ७ मे रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात Burglary in Tivasa city चोरट्यांनी धाडसी घरफोडी करत अनेक घरांना लक्ष्य केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेत सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती समोर आली आहे.
 
 
Tivasa
 
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या साधारण तीन वाजताच्या दरम्यान अज्ञात चार चोरट्यांनी वीरेंद्र सावरकर यांच्या घरात प्रवेश केला. घरातील कपाटातील पर्समध्ये ठेवलेले सुमारे २२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र तसेच खिशातील तीन ते चार हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली. दरम्यान, चोरी करत असताना कपाट फोडतांनाचा आवाज घरमालक वीरेंद्र सावरकर यांना येताच त्यांना जाग आली. त्यांनी तत्काळ आवाज देत चोरट्यांचा पाठलाग केला असता चोरटे आणि सावरकर यांच्यात झटापटही झाल्याचे संबंधितांकडून सांगण्यात येत आहे. मात्र अंधाराचा फायदा घेत चोरटे घटनास्थळावरून पसार झाले.
 
 
Burglary in Tivasa city  या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे चोरट्यांनी केवळ एकाच घरावर न थांबता शिवनगरी परिसरातील इतर घरांनाही लक्ष्य केले होते. सावरकर यांच्या घरामागील अंकुश प्रकाश ऊनोने यांच्या घरातही चोरट्यांनी प्रवेश करून घराची झाडाझडती घेतली. या घरातून आठ ते दहा हजार रुपये रोख तसेच लहान मुलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय शिवनगरीतील सागर बाबाराव खंडारे यांच्या घरालाही चोरट्यांनी लक्ष्य केले आणि पाच ते सहा सहा हजार रुपये लंपास केले तसेच त्याच परिसरातील जगदीश दहिवडे यांच्या घरातही संशयितांनी प्रवेश केल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून देण्यात आली. एका पाठोपाठ अनेक घरांवर डल्ला मारण्यात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या गस्त व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत असून फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले आहे. लवकरच आरोपींचा माग काढण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.