नवी दिल्ली,
flyover-ambulance-catches-fire : दिल्लीतील मोती बाग फ्लायओव्हरजवळ आज एका चालत्या रुग्णवाहिकेला अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आगीची तीव्रता इतकी मोठी होती की, रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला, ज्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णवाहिका रस्त्यावरून जात असताना अचानक त्यातून धूर निघू लागला आणि काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. आग लागताच चालकाने प्रसंगावधान राखून रुग्णवाहिकेतून बाहेर उडी मारली, ज्यामुळे सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. मात्र, आगीच्या दरम्यान झालेल्या सिलिंडरच्या स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की आसपासचे लोक दहशतीखाली आले.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. या भीषण आगीत रुग्णवाहिका जळून खाक झाली आहे. या अपघातामुळे मोती बाग परिसरात काही काळ वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. प्राथमिक अंदाजानुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा संशय व्यक्त केला जात असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
सौजन्य: सोशल मीडिया