धुळघाट वनपरिक्षेत्रातील जंगलात अग्नितांडव

    दिनांक :07-May-2026
Total Views |
वनाधिकार्‍यांची दुचाकी जळून खाक
 
धारणी, 
Dhulghat forest fire मेळघाट वन्यजीव विभागाच्या रेल्वे धुळघाट वनपरिक्षेत्रांतर्गत येणार्‍या जंगल परिसरात गुरुवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. आग विझवण्यासाठी घटनास्थळी धाव घेतलेल्या वन अधिकारी व कर्मचार्‍यांची दुचाकी आगीत जळून खाक झाली असून सुदैवाने वन अधिकारी आणि कर्मचार्‍यांचा जीव थोडक्यात बचावला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
 
 
fire
 
Dhulghat forest fire  प्राप्त माहितीनुसार, रेल्वे धुळघाट वनपरिक्षेत्रातील गोलाई वर्तुळ अंतर्गत गोलाई बीटच्या कंपार्टमेंट क्रमांक ११४७ मध्ये गुरुवारी दुपारी सुमारे बारा वाजताच्या दरम्यान जंगलात आग लागल्याची माहिती वर्तुळ अधिकारी एम. शेख शाकीर यांना प्राप्त झाली. माहिती मिळताच वनपाल शेख शाकीर यांनी वनरक्षक आकाश बेटे, पूजा उईके तसेच वनमजूर मोहम्मद भाई यांच्यासह होंडा युनिकॉर्न दुचाकीने घटनास्थळी धाव घेतली. वन अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू केले. मात्र वाढत्या उष्णतेमुळे आणि कोरड्या जंगलामुळे आग काही क्षणांतच भीषण स्वरूप धारण करू लागली. आग इतक्या वेगाने पसरली की वन अधिकारी व कर्मचार्‍यांना चारही बाजूंनी आगीने घेरले. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून त्यांनी तत्काळ स्वतःचा बचाव केला. मात्र त्यांच्या नवीन होंडा युनिकॉर्न दुचाकीला आगीने कवेत घेत पूर्णपणे जाळून टाकले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वन कर्मचार्‍यांनी प्रसंगावधान राखल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. जंगलातील वाढत्या आगीमुळे वन विभागासमोर मोठे आव्हान निर्माण झाले असून परिसरातील वनसंपत्तीचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. घटनेचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली धुळघाट वनपरिक्षेत्र अधिकारी करीत आहेत.