उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकॉप्टचे आपत्कालीन लँडिंग

    दिनांक :07-May-2026
Total Views |
मुंबई
Eknath Shinde राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरला गुरुवारी अचानक बदललेल्या हवामानामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. कल्याण–मुरबाड परिसरात सुरू झालेल्या वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे हेलिकॉप्टर हवेतच अडकले होते. परिस्थिती गंभीर बनत असल्याचे लक्षात येताच वैमानिकाने प्रसंगावधान दाखवत जुहू विमानतळावर सुरक्षित आपत्कालीन लँडिंग केले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून उपमुख्यमंत्र्यांसह सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले.
 

Eknath Shinde  
मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईतील महालक्ष्मी परिसरातून ठाणे जिल्ह्यातील मुरबाडकडे एका खासगी कार्यक्रमासाठी रवाना झाले होते. मात्र कल्याण आणि मुरबाड परिसरात अचानक हवामानात मोठा बदल झाला. जोरदार वारे, धुळीचे वादळ आणि पावसामुळे दृश्यता अत्यंत कमी झाली. या परिस्थितीत हेलिकॉप्टर काही काळ हवेतच अडकून राहिले.हवामानाची तीव्रता वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर वैमानिकाने सुरक्षिततेला प्राधान्य देत उड्डाणाचा मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हेलिकॉप्टर मुंबईतील जुहू विमानतळावर उतरवण्यात आले. जुहू विमानतळ येथे ही आपत्कालीन लँडिंग प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. या संपूर्ण घटनेदरम्यान कोणतीही तांत्रिक बिघाडाची माहिती समोर आलेली नाही.प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार, परिसरात अचानक आलेल्या वादळी हवामानामुळे ही परिस्थिती निर्माण झाली होती. लँडिंगनंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक, सुरक्षा कर्मचारी आणि विमान कंपनीचे प्रतिनिधी सर्वजण सुरक्षितपणे बाहेर पडले. त्यानंतर सर्व संबंधित व्यक्ती पुढील प्रवासासाठी रवाना झाल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, मुंबई आणि Eknath Shinde ठाणे परिसरात गुरुवारी संध्याकाळी जोरदार वादळासह पाऊस झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक ठिकाणी वाऱ्याचा वेग अधिक असल्याने नागरिकांनाही अडचणींचा सामना करावा लागला.या घटनेमुळे व्हीआयपी हवाई प्रवासाच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर उड्डाण नियम अधिक कठोर करण्याची मागणीही काही स्तरातून व्यक्त होत आहे.