महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी ‘लाडकी बहीण’ सोसायटी महत्त्वपूर्ण : जिल्हाधिकारी कुंभेजकर

‘लाडकी बहीण’ क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना

    दिनांक :07-May-2026
Total Views |
वाशीम,
ladki bahin credit cooperative society महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बचत व पतसंस्थांचे जाळे अधिक मजबूत होणे आवश्यक असून लाडकी बहीण क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी महिलांच्या स्वावलंबनासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.
 
 
ladki bahin credit cooperative society
 
 
महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) वाशीम यांच्या पुढाकारातून जिल्ह्यात लाडकी बहीण उपक्रमांतर्गत लाडकी बहीण क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, वाशीमची स्थापना करण्यात आली. या सोसायटीचे नोंदणी प्रमाणपत्र जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी सोसायटीच्या महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. जिल्ह्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
सोसायटीमध्ये आतापर्यंत सुमारे १ हजार ७०० महिलांनी सहभाग नोंदवला असून, सदस्यांनी एकूण १० लाख २० हजार रुपयांचे शेअर भांडवल जमा केले आहे. या निधीच्या माध्यमातून महिलांसाठी विविध आर्थिक व्यवहार व उपक्रम राबविण्यात येणार आहेत. लाडकी बहीण उपक्रमांतर्गत स्थापन झालेली ही क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी महिलांना बचत, कर्जसुविधा आणि स्वावलंबनाच्या नव्या संधी उपलब्ध करून देणार आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांच्या आर्थिक उन्नतीस यामुळे चालना मिळणार असल्याचा विश्वास जिल्हाधिकार्‍यांनी व्यक्त केला.
ही सोसायटी जिल्हा निबंधक साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आली.ladki bahin credit cooperative society यावेळी सहाय्यक निबंधक प्रशासन आर. आर. सावंत, एलडीएम यशवीर कुमार, नाबार्डचे शंकर कोकडवार, जिल्हा समन्वय अधिकारी वर्षा खोब्रागडे यांच्यासह माविम, डीआयसी, आरोग्य, शिक्षण, खादी ग्रामोद्योग, डीआरडीए, आयसीआयसीआय व सीएमआरसी उपस्थित होते.