वेध....
नंदकिशोर काथवटे,
fraudulent-calls : देशात सध्या आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढताना दिसत आहेत. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे व्यवहार सोपे झाले, पण त्याचबरोबर गुन्हेगारांनाही नवे मार्ग सापडले. कर्जमाफी, पॉलिसी मॅच्युअर, मोठा गिफ्ट, इन्व्हेस्टमेंट परतावा अशा आकर्षक आमिषांनी सामान्य माणसांना जाळ्यात ओढले जात आहे. अलिकडे तर लोकांच्या मोबाईलवर येणारे कॉल, मेसेज किंवा सोशल मीडियावरील जाहिराती यांच्यामार्फत फसवणूक करण्याचे प्रकार राजरोस सुरू आहेत. याबाबत केंद्रीय बँकेनेही वारंवार इशारा दिला असतानाही अनेक जण अजूनही या जाळ्यात अडकत आहेत.
फसवणुकीचे प्रकार आणि फसवणूक करणारेही दिवसेंदिवस अधिक चतुर होत चालले आहेत. तुमच्या खात्यात चुकून पैसे जमा झाले आहेत असा खोटा मेसेज दाखवून लोकांकडून पैसे परत करून घेण्याचा प्रकार, पॉलिसी बंद होणार आहे म्हणून घाईघाईने हप्ते भरायला लावणे किंवा ऑनलाईन ऑर्डर अडकली आहे म्हणून अतिरिक्त रक्कम भरण्यास भाग पाडणे हे सगळे प्रकार केवळ लोकांच्या विश्वासावर चालतात. एका क्षणाचा निष्काळजीपणा आयुष्यभराची बचत गमावू शकतो, ही वस्तुस्थिती आता सर्वांनी समजून घ्यायला हवी.
विशेषतः कर्जमाफी या नावाखाली होणारी फसवणूक अधिक धोकादायक ठरत आहे. अनेक शेतकरी, लघुउद्योजक किंवा कर्जबाजारी नागरिकांना फोन करून तुमचे कर्ज माफ झाले आहे, फक्त प्रोसेसिंग फी भरा असे सांगितले जाते. काही वेळा बनावट कागदपत्रे, सरकारी शिक्के आणि बनावट वेबसाईट्स दाखवून विश्वास निर्माण केला जातो. प्रत्यक्षात कोणतीही सरकारी कर्जमाफी योजना ही अधिकृत घोषणांद्वारे आणि बँकांच्या माध्यमातूनच राबवली जाते, वैयक्तिक फोन किंवा मेसेजद्वारे नाही. त्यामुळे अशा कॉल्सवर विश्वास ठेवणे म्हणजे स्वतःहून फसवणुकीला आमंत्रण देण्यासारखे आहे. या पृष्ठभूमीवर नागरिकांनी काही मूलभूत पथ्ये पाळणे अत्यंत गरजेचे आहे. सर्वप्रथम, कोणत्याही अनोळखी कॉल किंवा मेसेजवर विश्वास ठेवू नये. बँक, विमा कंपनी किंवा सरकारी संस्था कधीही फोनवरून ओटीपी, पासवर्ड किंवा खातेविषयक माहिती मागत नाहीत, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. कोणतीही आर्थिक व्यवहाराची लिंक क्लिक करण्याआधी तिची खातरजमा करावी. जलद नफा किंवा मोठा फायदा अशा आमिषांना बळी पडणे टाळावे. व्यवहार करताना अधिकृत अॅप्स आणि सुरक्षित वेबसाईट्सचाच वापर करावा.
ऑनलाईन खरेदी करताना देखील सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. अज्ञात वेबसाईट्सवरून खरेदी करणे टाळावे, तसेच ‘अॅडव्हान्स पेमेंट’ मागणाèया संशयास्पद विक्रेत्यांपासून दूर राहावे. कुरिअर अडकल्याच्या नावाखाली पैसे मागितले गेले, तर प्रथम संबंधित अधिकृत कंपनीशी संपर्क साधून खात्री करावी. प्रत्येक व्यवहारानंतर बँकेचे एसएमएस किंवा अॅप नोटिफिकेशन नीट तपासणे आणि काही संशयास्पद दिसल्यास तत्काळ बँकेशी संपर्क साधणे ही सवय लावावी. रिझर्व्ह बँकेनेही नागरिकांसाठी काही स्पष्ट आणि कडक सूचना दिलेल्या आहेत. कोणत्याही प्रकारच्या कर्जमाफी, लॉटरी, इनाम किंवा गुंतवणूक दुप्पट अशा ऑफर्सवर विश्वास ठेवू नये, असे वारंवार सांगण्यात आले आहे. बँक कधीही ग्राहकांकडून ओटीपी, सीव्हीसी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड मागत नाही, ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.
याशिवाय, संशयास्पद कॉल्स किंवा व्यवहार तत्काळ अधिकृत हेल्पलाईनवर कळवणे, तसेच सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार नोंदवणे आवश्यक आहे. रिझर्व्ह बँकेने नो युअर कस्टमर (केवायसी) प्रक्रियेच्या नावाखाली होणाèया फसवणुकीपासून सावध राहण्याचाही इशारा दिला आहे. यासोबतच, डिजिटल व्यवहार करताना दोन-स्तरीय सुरक्षा वापरणे, मोबाईलमध्ये अनोळखी अॅप्स डाऊनलोड न करणे आणि सार्वजनिक वाय-फायवर आर्थिक व्यवहार टाळणे या बाबींचाही विशेष उल्लेख करण्यात आला आहे. फसवणूक झाल्यास घाबरून न जाता तत्काळ बँक खाते ब्लॉक करणे, कार्ड बंद करणे आणि अधिकृत तक्रार नोंदवणे हे नुकसान कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरते.
फक्त नागरिकांनीच नव्हे, तर शासनानेही या समस्येकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पथके अधिक सक्षम करणे, तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सुलभ करणे आणि जलद कारवाई करणे अत्यावश्यक आहे. ग्रामीण भागात आणि लहान शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम राबविणे गरजेचे आहे. शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी सायबर सुरक्षा विषयक मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केल्यास लोकांमध्ये जागरूकता वाढेल. याशिवाय, फसवणूक करणाèया कॉल सेंटर्सवर कठोर कारवाई करून त्यांची साखळी तोडणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
शेवटी एकच लक्षात ठेवले पाहिजे की, मोबाईलवरील प्रत्येक कॉल हा संधी नसतो, तो कधी कधी सापळाही असू शकतो. विचारपूर्वक घेतलेला निर्णयच तुमची आयुष्यभराची कमाई सुरक्षित ठेवू शकतो.
9922999588