रेल्वेत तरुणांसाठी सुवर्णसंधी! परीक्षेशिवाय होणार निवड

    दिनांक :07-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
railways job vaccancy भारतीय रेल्वेत नोकरी करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने (SECR) २०२६-२७ या सत्रासाठी तब्बल १६४४ ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर केली आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेत उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत द्यावी लागणार नाही. दहावी आणि आयटीआयमधील गुणांच्या आधारे थेट गुणवत्ता यादी तयार करून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
 
 
railways job vaccancy
 
 
ही भरती रायपूर विभाग आणि वॅगन रिपेअर शॉपसाठी होणार असून फिटर, इलेक्ट्रीशियन, वेल्डर, मशिनिस्ट, कोपा, स्टेनो तसेच मेकॅनिक अशा विविध ट्रेडमध्ये जागा उपलब्ध आहेत.
 
 शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळातून किमान ५० टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर संबंधित ट्रेडमधील एनसीव्हीटी किंवा एससीव्हीटी मान्यताप्राप्त आयटीआय प्रमाणपत्रही आवश्यक राहणार आहे.
उमेदवारांचे वय किमान १५ वर्षे आणि कमाल २४ वर्षांपर्यंत असावे. वयोमर्यादेची गणना ५ मे २०२६ या तारखेप्रमाणे केली जाईल. अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गाला ५ वर्षे, इतर मागास प्रवर्गाला ३ वर्षे तर दिव्यांग आणि माजी सैनिकांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे.
 
निवड प्रक्रिया कशी होणार?
या भरतीमध्ये कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत होणार नाही. उमेदवारांच्या दहावी आणि आयटीआयमधील गुणांना प्रत्येकी ५० टक्के महत्त्व दिले जाईल. या गुणांच्या सरासरीवर अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाणार असून त्यानंतर पात्र उमेदवारांना कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीसाठी बोलावले जाईल.
 
अर्जाची अंतिम तारीख
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ५ मे २०२६ पासून सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांना ४ जून २०२६ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे.
 
अर्ज प्रक्रिया अशी करा
  • अप्रेंटिसशिप इंडिया पोर्टलवर भेट द्या
  • नवीन नोंदणी करून लॉगिन तयार करा
  • ‘एस्टॅब्लिशमेंट सर्च’मध्ये SECR रायपूर शोधा
  • संबंधित ट्रेडसमोरील ‘अप्लाय’ पर्यायावर क्लिक करा
  • आवश्यक माहिती भरून कागदपत्रे अपलोड करा
  • माहितीची पडताळणी करून अर्ज सादर करा
  • भविष्यासाठी अर्जाची प्रत जतन करून ठेवा