मुख्यमंत्री विज्ञान वारी उपक्रमाला शासनाची मंजुरी

*शिक्षण राज्यमंत्री डॉ. भोयर यांची संकल्पना

    दिनांक :07-May-2026
Total Views |
वर्धा,
science wari राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण करून वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याच्या उद्देशाने शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘मुख्यमंत्री विज्ञान वारी’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला अखेर शासनाची अधिकृत मंजुरी मिळाली आहे. शालेय शिक्षण विभागाने ६ मे रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला असून राज्यभरातील शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या निर्णयामुळे ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना विज्ञानाची प्रत्यक्ष अनुभूती घेण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
 
 

विज्ञान वारी  
 
 
 
विद्यार्थ्यांमध्ये केवळ पुस्तकापुरते शिक्षण न राहता प्रत्यक्ष प्रयोग, संशोधन, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष याबद्दल आकर्षण निर्माण व्हावे, या उद्देशातून ‘मुख्यमंत्री विज्ञान वारी’ ही संकल्पना ना. डॉ. भोयर मांडली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अखेर राज्य शासनाने या उपक्रमाला हिरवा कंदील दिला आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांना नासा, इस्त्रो, रमण विज्ञान केंद्र, पिंपरी चिंचवड सायन्स सेंटर, नेहरू तारांगण केंद्र मुंबई भेटी देण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वैज्ञानिक प्रयोग, विज्ञान प्रदर्शन, मॉडेल्स, रोबोटिस, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती अनुभवातून मिळणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विशेष प्राधान्य देण्यात येणार असून विज्ञान शिक्षणातील दरी कमी करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. शासन निर्णयानुसार या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी शालेय शिक्षण विभाग, विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, जिल्हा प्रशासन, शिक्षणाधिकारी, शाळा व्यवस्थापन समित्या तसेच विविध वैज्ञानिक संस्था यांचे समन्वयाने नियोजन करण्यात येणार आहे.
तालुका स्तरावरील विज्ञान प्रदर्शनीत प्रथम येणार्‍या सहा असे एकूण २१४८ विद्यार्थी व २० पर्यवेदक्षक यांना राज्यातील विज्ञान केंद्राला भेटी देण्यात येणार आहे.science wari तर जिल्हा स्तरावरील सर्व गटातील १८० विद्यार्थी व ८ पर्यवेक्षक अथवा शिक्षक बंगळुरू येथे इस्त्रो केंद्राला व राज्यस्तरावरील विज्ञान प्रदर्शनीतील उत्कृष्ट ५१ विद्यार्थी, एक शिक्षक, एक शिक्षिका, दोन प्रशासकीय अधिकारी अथवा समन्वयक असे एकूण ५५ जणांना अमेरिका येथील नासा केंद्राला भेट देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना विज्ञानाधिष्ठित विचारसरणीची गरज
महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती निर्माण व्हावी, विज्ञानाची भीती दूर व्हावी आणि नवकल्पनांना चालना मिळावी, हा मुख्यमंत्री विज्ञान वारीचा मुख्य उद्देश आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाची समान संधी मिळावी यासाठी हा उपक्रम प्रभावी माध्यम ठरेल.
-डॉ. पंकज भोयर
शालेय शिक्षण राज्यमंत्री