घरात घुसून चिमुकल्यासह आजोबांवर प्राणघातक हल्ला

    दिनांक :07-May-2026
Total Views |
आलापल्ली,
aalapalli crime गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील देवलमारी येथे माणुसकीला काळिमा फासणारी आणि अंगावर शहारे आणणारी घटना उघडकीस आली आहे. भरदिवसा घरात घुसून एका माथेफिरूने 78 वर्षीय वृद्धासह त्यांच्या 7 वर्षीय निरागस नातवावर धारदार सुर्‍याने पोटावर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात आजोबा आणि नातू दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
 

घरात घुसून चिमुकल्यासह आजोबांवर प्राणघातक हल्ला 
 
 
मंगळवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास देवलमारी येथील रहिवासी पोशन्ना वेकय्या कोपुलवार (78) हे आपल्या घरात नातवासोबत बसले होते. घरातील इतर सदस्य नेहमीप्रमाणे कामात व्यस्त असताना, पोशन्ना आणि त्यांचा 7 वर्षीय नातू अच्युत हे दिवाणखान्यात टीव्ही पाहत होते. शांतता असताना अचानक गावातीलच आरोपी गोपाल बकलु लेंकुर (35 वर्ष) हातात धारदार सुरा घेऊन घरात शिरला. काहीही समजण्याच्या आत आरोपीने थेट लहानग्या अच्युतच्या दिशेने सुरा चालवला. काळजाचा तुकडा असलेल्या नातवावर हल्ला होताना पाहून आजोबांनी प्राणांची बाजी लावून त्याला वाचवण्यासाठी मध्ये धाव घेतली. मात्र, नराधम गोपालने आजोबांच्या पोटावर सुर्‍याने गंभीर वार केले. संतापजनक बाब म्हणजे, आजोबांना जखमी केल्यानंतरही त्याने चिमुरड्या अच्युतला सोडले नाही आणि त्याच्याही पोटावर वार करून त्याला रक्ताच्या थारोळ्यात पाडले.
 
रक्ताळलेल्या अवस्थेत आजोबा आणि नातवाने आरडाओरडा सुरू केल्यावर घरातील इतर सदस्य व शेजारी मदतीला धावून आले. लोकांचा वाढता जमाव पाहून आरोपी गोपालने तेथून पळ काढला.aalapalli crime रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोघांनाही तत्काळ स्थानिकांनी देवलमारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवले. मात्र, दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याने आणि खोलवर जखमा असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
 
या घटनेची माहिती मिळताच अहेरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली. अहेरी पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बाजीराव सोमाजी सिडाम यांच्याकडे अधिक तपास सोपवण्यात आला आहे.

आरोपी हा शारीरिकदृष्ट्या ठीक नसल्याने भारतीय न्याय संहिता (बीएनएस) नुसार, कलम 35 (3) अंतर्गत आरोपीला नोटीस देण्यात आली असून, त्याला वेळोवेळी पोलिस स्टेशनमध्ये उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. आरोपीला नियमानुसार न्यायालयात हजर केले जाईल.
मंगेश वळवी, पोलिस उपनिरीक्षक, अहेरी.