नवी दिल्ली
Health support for workers देशातील कामगार वर्गासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय जाहीर केला आहे. आता चाळीस वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व कामगारांना दरवर्षी मोफत आरोग्य तपासणीची सुविधा मिळणार आहे. या उपक्रमामुळे आरोग्याच्या समस्या सुरुवातीच्या टप्प्यातच ओळखता येतील आणि गंभीर आजारांपासून बचाव करणे शक्य होईल, असा सरकारचा दावा आहे. दिल्लीतील कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात या योजनेची अधिकृत घोषणा करण्यात आली. यावेळी केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की, या निर्णयाचा उद्देश कामगारांच्या आरोग्याला प्राधान्य देणे आणि त्यांना सामाजिक सुरक्षिततेचा अधिक भक्कम आधार देणे हा आहे. कामगारांच्या सन्मान आणि कल्याणासाठी सरकार सातत्याने पावले उचलत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या योजनेअंतर्गत आता देशभरातील लाखो कामगारांना वार्षिक आरोग्य तपासणी मोफत उपलब्ध होणार आहे. सरकारच्या मते, यामुळे आजार लवकर ओळखता येतील आणि उपचार वेळेवर होऊ शकतील. यामुळे कामगारांचे आरोग्य सुधारण्यासोबतच त्यांची कार्यक्षमताही वाढेल.मंत्री मांडविया यांनी यावेळी सांगितले की, मागील काही वर्षांत कामगार आणि युवकांसाठी अनेक सुधारणा राबवण्यात आल्या आहेत. सामाजिक सुरक्षा कवचाचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढला असून, अधिकाधिक लोकांना त्याचा लाभ मिळत आहे. तसेच कामगार कायद्यांमध्ये बदल करून महिलांना समान वेतन, प्रसूती रजा वाढ आणि घरगुती तपासणीसारख्या सुविधा देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी असेही स्पष्ट केले की, असंघटित क्षेत्रातील तसेच कमी कामगार असलेल्या आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांनाही आता आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळणार आहे. यामुळे कामगार वर्गाला अधिक सुरक्षित आणि सन्मानजनक जीवन मिळेल, असा सरकारचा विश्वास आहे.