चंद्रनाथ रथ हत्येप्रकरणी विशेष तपास पथक स्थापन

    दिनांक :07-May-2026
Total Views |
कोलकाता,
investigation team in Chandranath Rath murder पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण तापलेले असतानाच भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या हत्येप्रकरणी तपासाला वेग देण्यात आला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली असून, या पथकाचे नेतृत्व पोलीस महानिरीक्षक दर्जाचे अधिकारी करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या विशेष पथकात विविध जिल्ह्यांतील अनुभवी पोलीस अधिकारी आणि गुन्हे अन्वेषण शाखेतील कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. हत्येमागील संपूर्ण कट उघड करण्यासाठी सर्व बाजूंनी तपास सुरू करण्यात आला आहे. काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून मुख्य हल्लेखोरांचा शोध अद्याप सुरू आहे.
 
 
rath
 
चंद्रनाथ रथ यांच्यावर उत्तर चोवीस परगणा जिल्ह्यातील मध्यग्राम परिसरात गोळीबार करण्यात आला होता. ते रात्री उशिरा वाहनातून घरी परतत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या वाहनाला अडवत अचानक गोळ्यांचा वर्षाव केला. या हल्ल्यात रथ गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत वाहन चालकही जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरील पुरावे गोळा केले असून परिसरातील दृश्यचित्रफितींची तपासणी सुरू आहे. या हत्येनंतर राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून विरोधकांकडून कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.