नवी दिल्ली,
Medical entrance exam answer sheet नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या पदवीपूर्व परीक्षेची तात्पुरती उत्तरपत्रिका प्रसिद्ध केली आहे. ३ मे रोजी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आता अधिकृत संकेतस्थळावर जाऊन उत्तरपत्रिका पाहता येणार असून, त्यामुळे स्वतःच्या उत्तरांची पडताळणी करून संभाव्य गुणांचा अंदाज घेणे शक्य होणार आहे. या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया फेब्रुवारी महिन्यात सुरू झाली होती. विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर अर्जातील चुका दुरुस्त करण्यासाठी काही दिवस विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. देशभरातील विविध केंद्रांवर ही परीक्षा पार पडली होती.

परीक्षा संस्थेकडून लवकरच विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांच्या प्रतीदेखील उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांना आपला अर्ज क्रमांक आणि संकेतशब्द वापरून प्रवेश करावा लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेली उत्तरे तपासता येतील. जर एखाद्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे असल्याचा संशय विद्यार्थ्यांना वाटत असेल, तर त्यांना ऑनलाइन पद्धतीने आक्षेप नोंदवण्याची संधी दिली जाणार आहे. प्रत्येक आक्षेपासाठी निश्चित शुल्क आकारले जाईल. सर्व हरकतींचा विचार करून अंतिम उत्तरपत्रिका प्रसिद्ध केली जाईल आणि त्यानंतर निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
या परीक्षेच्या गुणपद्धतीनुसार प्रत्येक बरोबर उत्तरासाठी चार गुण दिले जातात, तर चुकीच्या उत्तरासाठी एक गुण वजा केला जातो. उत्तर न दिलेल्या प्रश्नांसाठी कोणताही गुण दिला जात नाही. त्यामुळे विद्यार्थी अधिकृत उत्तरपत्रिकेच्या आधारे स्वतःचे अपेक्षित गुण मोजू शकतात. दरम्यान, या महिन्यातच परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिकृत संकेतस्थळावर नियमित लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.