मुंबई कोळी समाजाची आहे, ती कोणाच्या बापाची नाही

    दिनांक :07-May-2026
Total Views |
मुंबई
Ritu Tawde मुंबईतील वाकोला येथील मासळी बाजारात मासे कापणे आणि स्वच्छ करण्यावर मुंबई महानगरपालिकेने बंदी घातल्याची चर्चा सुरू असतानाच महापौर रितू तावडे यांनी या वृत्ताचे खंडन करत कोणताही असा निर्णय घेण्यात आलेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. काही राजकीय गटांकडून जाणीवपूर्वक अफवा पसरवून कोळी समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
 

Mumbai fish market controversy, Vakola fish market, Mumbai Koli community, fish cutting ban rumour, Ritu Tawde statement 
वाकोला येथील मासळी बाजाराला भेट देताना रितू तावडे यांनी मासळी विक्री करणाऱ्या महिलांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी “बिनधास्त मासे कापा, मी तुमच्या पाठीशी आहे,” असे सांगत विक्रेत्यांना आश्वस्त केले. मासे कसे घ्यायचे आणि स्वच्छ करून घ्यायचे की नाही, हा निर्णय ग्राहकांचा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या प्रकरणात ठाकरे गटाच्या सोशल मीडिया पेजवरून दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करण्यात आल्याचा आरोप करत तावडे म्हणाल्या की, “मुंबई कोळी समाजाची आहे, ती कोणाच्या बापाची नाही. मुंबई महापालिका आता त्यांच्या हातात राहिलेली नाही, त्यामुळे मुद्दे नसल्याने अशा प्रकारे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे.”कोळी समाजाच्या पाठीशी राज्य सरकार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उभे असल्याचे सांगत त्यांनी मासळी विक्रेत्यांसाठी सुविधा वाढविण्याच्या दृष्टीने काम सुरू असल्याची माहिती दिली. बाजारात महिलांना बसण्याची व्यवस्था, नव्या मासळी बाजाराची उभारणी तसेच आईस बॉक्स उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
 
दरम्यान, या कथित बंदीच्या वृत्तामुळे मासळी विक्रेत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. आदेशाचे पालन न केल्यास कारवाई होईल, अशी चर्चा देखील रंगली होती. यानंतर ठाकरे गटाने मुंबई महापालिका प्रशासनावर टीका केली होती. मात्र, महापौरांनी स्वतः बाजारात जाऊन कोणतीही बंदी नसल्याचे स्पष्ट केल्याने परिस्थिती काहीशी निवळली आहे.याबाबत मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त अलका ससाने यांनीही स्पष्टीकरण दिले. “महापालिकेचे सर्व आदेश लेखी स्वरूपात काढले जातात. अशा प्रकारचा कोणताही लेखी आदेश किंवा सर्क्युलर जारी करण्यात आलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये,” असे त्या म्हणाल्या.या संपूर्ण प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले असून कोळी समाज आणि मासळी विक्रेत्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात येत आहे.