नवी दिल्ली,
chandranath rath पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले असतानाच भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे खासगी सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या हत्येने मोठी खळबळ उडाली आहे. बुधवारी रात्री उशिरा झालेल्या या हल्ल्यात अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करून रथ यांची हत्या केली. तपासादरम्यान हल्ल्यासाठी वापरण्यात आलेल्या वाहनावर बनावट नंबर प्लेट असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना रात्री सुमारे १० ते १०:१५ दरम्यान घडली. चंद्रनाथ रथ आपल्या चालकासह कारने घरी जात होते. त्यांच्यासोबत मागील सीटवर मिंटू नावाचा एक व्यक्तीही उपस्थित होता. घरापासून अवघ्या काही अंतरावर असताना हल्लेखोरांनी त्यांची कार अडवली.
तीन आरोपींचा सहभाग असल्याचा संशय
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, या हत्याकांडात किमान तीन जणांचा सहभाग असावा. एक जण चंदेरी रंगाच्या चारचाकीत होता, तर दोन आरोपी मोटरसायकलवरून आले होते. आरोपींनी आधी रथ यांच्या कारसमोर वाहन उभे करून रस्ता रोखला. त्यामुळे चालकाला गाडी थांबवावी लागली.
यानंतर मोटरसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी थेट कारवर गोळीबार सुरू केला. हल्लेखोराने कारच्या काचेवर बंदूक रोखून सलग गोळ्या झाडल्याचे तपासात समोर आले आहे. चंद्रनाथ रथ यांच्या छातीत तीन गोळ्या लागल्या, तर चालकही गंभीर जखमी झाला.
बनावट नंबर प्लेट आणि पुसलेला चेसिस नंबर
पोलिस तपासात आणखी धक्कादायक बाब समोर आली आहे. हल्ल्यासाठी वापरण्यात आलेल्या चंदेरी रंगाच्या कारवरील नंबर प्लेट बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच वाहनाचा चेसिस क्रमांकही पुसून टाकण्यात आला होता. त्यामुळे हल्लेखोरांनी संपूर्ण कट अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने रचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सीसीटीव्ही फुटेज तपासात महत्त्वाचे
घटनास्थळ लोकवस्तीच्या भागात असून परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत.chandranath rath पोलिसांनी विविध कॅमेऱ्यांचे फुटेज जप्त केले असून हल्लेखोरांनी कोणता मार्ग वापरला, ते कुठून आले आणि कुठे पसार झाले याचा मागोवा घेतला जात आहे.
राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात
या घटनेनंतर बंगालमधील राजकीय वातावरण आणखी तापले आहे. भाजप नेत्यांनी तृणमूल काँग्रेसवर गंभीर आरोप केले असून, या हत्येमागे राजकीय कट असल्याचा दावा केला जात आहे. सुवेंदू अधिकारी यांनीही या घटनेचा तीव्र निषेध करत “ही अत्यंत क्रूर हत्या असून बंगालमध्ये गुंडराज सुरू आहे,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.