घाटटेमणीतील गुरुदेव संस्कार शिबिराची राष्ट्रीय ओळख

- १९८२ पासून संस्कारांची अखंड परंपरा ः विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

    दिनांक :07-May-2026
Total Views |
आमगाव,
gurudev sanskar camp वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामजयंतीनिमित्त गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने तालुक्यातील घाटटेमणी येथे आयोजित करण्यात येणार्‍या गुरुदेव सार्वजनिक संस्कार शिबिराला यंदाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. १९८२ पासून सातत्याने सुरू असलेले हे शिबिर आज राष्ट्रीय पातळीवर एक आदर्श उपक्रम म्हणून ओळखले जात आहे.
 

घाटटेमणीतील गुरुदेव संस्कार शिबिराची राष्ट्रीय ओळख 
 
 
महाराष्ट्र राज्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या घाटटेमणी येथील या सुसंस्कार शिबिरात महाराष्ट्रासह मध्यप्रदेशातूनही मोठ्या संख्येने बालके सहभागी होत असतात. या शिबिराच्या माध्यमातून केवळ शारीरिक व मानसिक विकासच नव्हे, तर राष्ट्रीय प्रेम, देशभक्ती, कर्तव्यभावना आणि सामाजिक बांधिलकी यांचे संस्कार बालकांमध्ये रुजवले जात आहेत. त्यामुळे राष्ट्रनिर्मितीच्या दृष्टीने सक्षम, सजग आणि जबाबदार भावी पिढी घडविण्याचे कार्य या उपक्रमातून प्रभावीपणे सुरू आहे. शिबिरात सामुदायिक ध्यान, सूर्यदर्शन, परिसर स्वच्छता श्रमदान, सूर्यनमस्कार, योगासने व प्राणायाम, मलखांब, बौद्धिक तासिका, राष्ट्रीय प्रबोधन, भजन, शारीरिक खेळ, दंड-योग शिक्षण आणि राष्ट्र वंदना यासारख्या उपक्रमांचा समावेश आहे. या सर्व उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण, स्वावलंबन आणि देशसेवेची प्रेरणा जागवली जाते. विशेषतः राष्ट्रीय प्रबोधन व राष्ट्र वंदना यांद्वारे देशाच्या इतिहासाची जाणीव, स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाची प्रेरणा आणि राष्ट्रभक्तीची भावना दृढ केली जाते. शिबिरातील बौद्धिक सत्रांमध्ये नैतिक मूल्ये, भारतीय संस्कृती, संविधानिक कर्तव्ये, पर्यावरण संवर्धन, व्यसनमुक्ती आणि सामाजिक जबाबदारी यावर मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे बालकांमध्ये सकारात्मक विचारसरणी विकसित होत असून समाजहितासाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळते.gurudev sanskar camp गेल्या चार दशकांत या शिबिरातून घडलेले अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत असून समाजसेवा व राष्ट्रसेवेत सक्रिय आहेत. त्यामुळेच या शिबिराची ख्याती राज्यापुरती मर्यादित न राहता देशभरात पोहोचली आहे आणि एक सुसंस्कारित, राष्ट्रप्रेमी पिढी घडविणारे केंद्र म्हणून याची ओळख निर्माण झाली आहे. यंदाचे शिबिर २९ एप्रिलपासून सुरु झाले असून १५ मे रोजी या शिबीराचे समापन होणार आहे. तेव्हा ग्रामस्थ, पालक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या संस्कारमय उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.