नवी दिल्ली,
noida-airport-opens : दिल्ली-एनसीआरमधील प्रवाशांची प्रदीर्घ प्रतीक्षा आता संपली असून जेवर येथील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून येत्या १५ जून २०२६ पासून व्यावसायिक विमान सेवा अधिकृतपणे सुरू होणार आहे. या नवीन आणि भव्य विमानतळावरून पहिले उड्डाण करण्याचा मान देशातील आघाडीची विमान कंपनी असलेल्या 'इंडिगो'ला मिळाला आहे. इंडिगोच्या या पहिल्या उड्डाणासोबतच नोएडाच्या आकाशात व्यावसायिक विमानांची ये-जा सुरू होईल. इंडिगोपाठोपाठ 'अकासा एअर' आणि 'एअर इंडिया एक्स्प्रेस' या कंपन्यांनी देखील आपली सेवा सुरू करण्याची तयारी दर्शवली असून, सुरुवातीच्या टप्प्यात देशांतर्गत विमान सेवांवर अधिक भर दिला जाणार आहे.
विमान कंपन्या लवकरच त्यांच्या फ्लाईट शेड्युलची आणि निश्चित मार्गांची अधिकृत घोषणा करणार असून, त्यानंतर प्रवाशांसाठी तिकीट बुकिंगची खिडकी उघडली जाईल. प्राथमिक माहितीनुसार, एअर इंडिया एक्स्प्रेस नोएडा ते बेंगळुरू दरम्यान दररोज दोन उड्डाणे सुरू करण्याची शक्यता आहे. त्यासोबतच मुंबई, हैदराबाद आणि कोलकाता यांसारख्या प्रमुख शहरांसाठीही सुरुवातीला विमान सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीकडून विमानतळाच्या सुरक्षा आराखड्याला आधीच मंजुरी मिळाली असून विमानतळ आता पूर्णपणे सज्ज झाले आहे.
हे विमानतळ पहिल्या टप्प्यात वर्षाला साधारण १.२ कोटी प्रवाशांची वाहतूक हाताळण्यास सक्षम आहे. यमुना एक्सप्रेसवेला लागून असलेल्या या विमानतळामुळे दिल्ली, नोएडा आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील कोट्यवधी प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे. २८ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन झाले होते. आता प्रत्यक्ष विमान सेवा सुरू होत असल्याने दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील वाढता ताण कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. या विकासामुळे नोएडा आणि आसपासच्या परिसरात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होऊन आर्थिक विकासालाही गती मिळणार आहे.