मुंबई,
Nora to appear before Women's Commission अभिनेत्री नोरा फतेही हिच्या ‘सरके चुनर’ या गाण्याभोवती निर्माण झालेला वाद अजूनही शांत झालेला नाही. या प्रकरणात आता तिच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, राष्ट्रीय महिला आयोगासमोर तिला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. महिलांविषयी आक्षेपार्ह आणि अश्लील आशय असल्याचा आरोप या गाण्यावर करण्यात आला आहे. या वादामुळे यापूर्वी संजय दत्त यांनाही आयोगासमोर उपस्थित राहावे लागले होते. त्यांनी आयोगाकडे लेखी स्वरूपात दिलगिरी व्यक्त केल्याची माहिती समोर आली होती. आता या प्रकरणात नोरा फतेहीलाही स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. दरम्यान, अभिनेत्रीने यापूर्वी परदेशात असल्याचे कारण देत आयोगाकडे नव्या तारखेची मागणी केली होती. तसेच एका दृश्यफितीत तिने या गाण्याच्या हिंदी आवृत्तीशी आपला थेट संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.
तिच्या म्हणण्यानुसार, तिने हे गाणे कन्नड भाषेत चित्रित केले होते आणि हिंदी आवृत्तीसाठी तिने परवानगी दिली नव्हती. ‘सरके चुनर’ हे गाणे हिंदीत प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्या बोलांवरून मोठा वाद निर्माण झाला होता. महिलांचा अपमान करणारा आणि अश्लील आशय असल्याचा आरोप करत अनेक तक्रारी राष्ट्रीय महिला आयोगाकडे दाखल करण्यात आल्या. वाढत्या विरोधानंतर निर्मात्यांनी हे गाणे एका संकेतस्थळावरून हटवले, मात्र इतर माध्यमांवर ते उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणामुळे चित्रपटसृष्टीतही मोठी चर्चा रंगली असून, आयोगाच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.