मुंबई
operation mango उन्हाळ्याच्या आगमनासोबतच बाजारपेठांमध्ये रसाळ आंब्यांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते. मात्र हीच मागणी आता काही व्यापाऱ्यांकडून धोकादायक पद्धतीने पूर्ण केली जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. आंबा नैसर्गिकरीत्या पिकण्यासाठी लागणारा वेळ टाळण्यासाठी काही व्यापारी रसायनांचा वापर करून आंबे कृत्रिमरीत्या पिकवत असल्याचे आढळून आले असून, यावर महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभरात विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेला ‘ऑपरेशन मँगो’ असे नाव देण्यात आले आहे.
राज्यातील प्रमुख फळबाजार, गोदामे आणि वितरण केंद्रांवर लक्ष केंद्रित करत FDAने तब्बल १५० विशेष पथके तैनात केली आहेत. मुंबई, नवी मुंबईसह उपनगरांतील बाजारांमध्ये युद्धपातळीवर तपासणी सुरू असून, संशयित आंब्यांचे नमुने गोळा करून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जात आहेत.
नवी मुंबईतील वाशी येथील एपीएमसी फळ बाजारात नुकतीच मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान कृत्रिमरीत्या पिकवण्यासाठी वापरली जाणारी रसायने आणि संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आले. तपासणीत कॅल्शियम कार्बाइडचा वापर आंबे पिकवण्यासाठी केल्याचे प्राथमिक निष्कर्ष समोर आले आहेत. हे रसायन औद्योगिक वापरासाठी, विशेषतः गॅस वेल्डिंगसाठी वापरले जाते, मात्र अन्नपदार्थांसाठी त्याचा वापर पूर्णतः प्रतिबंधित आहे.
तज्ज्ञांच्या मते, कॅल्शियम कार्बाइडमधून निघणारा वायू आंब्याचा रंग लवकर बदलतो आणि तो बाहेरून आकर्षक दिसतो. तसेच काही ठिकाणी इथिलीन स्प्रेचा वापर करून फळे लवकर पिकवली जात असल्याचेही निदर्शनास आले आहे. अशा प्रकारे पिकवलेले आंबे ओळखणे सामान्य ग्राहकांसाठी कठीण ठरते, कारण ते दिसायला पूर्णपणे नैसर्गिक वाटतात.
मात्र, अशा रसायनांचा मानवी operation mango आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशा आंब्यांचे सेवन केल्यास घशात जळजळ, उलट्या, अतिसार आणि पोटदुखी यांसारख्या तक्रारी उद्भवू शकतात. दीर्घकालीन परिणामांमध्ये मज्जासंस्थेवर परिणाम होऊन स्मरणशक्तीवर परिणाम होणे तसेच कर्करोगाचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.या पार्श्वभूमीवर FDAने कडक भूमिका घेतली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे. ज्या ठिकाणी अशा प्रकारचे आंबे आढळतील त्या ठिकाणचे परवाने रद्द करण्याची कारवाईही करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.सध्या वाशी, भिवंडी आणि कल्याण येथील घाऊक बाजारांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले असून तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या प्रकारांवर कठोर कारवाई केली जाईल, असा ठाम संदेश FDAकडून देण्यात आला आहे.