विहीर अर्धवट सोडल्याने शेतकर्‍याचे मोठे नुकसान

    दिनांक :07-May-2026
Total Views |
ग्रामपंचायतच्या निष्काळजीपणावर संताप

पांढरकवडा, 
Public well construction incomplete तेलंगटाकळी ग्रामपंचायतमार्फत खोदण्यात सार्वजनिक विहीर अर्धवट अवस्थेत सोडल्यामुळे एका शेतकर्‍याच्या शेतीचे मोठे नुकसान झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याबाबत संबंधित शेतकर्‍याने पांढरकवडा पंचायत समिती येथे लेखी तक्रार करून तत्काळ कारवाईची मागणी केली आहे. तेलंगटाकळी येथील शेतकरी सुभाष बुचन्ना अल्लमवार यांच्या शेतात २०१६-२०१७ दरम्यान ग्रामपंचायततर्फे सार्वजनिक विहिरीचे काम सुरू करण्यात आले होते. विहिरीचे केवळ खोदकाम करून काम अर्धवट सोडण्यात आले. विहिरीचे बांधकाम पूर्ण न केल्यामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचून शेतातील सुपीक माती वाहून जात असल्याचा आरोप आहे.
 
 
vihir
 
Public well construction incomplete  यामुळे शेतजमिनीचे अतोनात नुकसान झाले असून विहिरीजवळील सागवानाचे झाडदेखील पडल्याचे अर्जात नमूद आहे. संबंधित विहिरीमुळे परिसरातील जनावरांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला असल्याची भीती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सार्वजनिक निधीतून करण्यात आलेले काम अर्धवट सोडल्यामुळे तेलंगटाकळी ग्रामपंचायतच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक वर्षांपासून विहीर खुलीच पडून असून प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी ग्रामपंचायतीने तत्काळ कायमस्वरूपी उपाययोजना करून विहीर सुरक्षित करावी अथवा ती बुजवून टाकावी, अशी तक्रारदाराने केली आहे. अन्यथा मोठा अपघात झाल्यास त्यास जबाबदार कोण, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
आर्थिक तरतूद नाही
हे प्रकरण जुने आहे. संबंधित विहीर बुजविण्यासाठी किंवा पूर्ण करण्यासाठी सध्या कोणतीही आर्थिक तरतूद नाही. मात्र गटविकास अधिकारी यांच्या परवानगीनंतर पुढील कार्यवाही सुरू करण्यात येईल.
संदीप कत्तुरवार
ग्रामसेवक, ग्रामपंचायत,