पुणे
Pune rape cases पुणे शहरात लैंगिक गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत सुमारे ५० गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणांमध्ये बहुतांश आरोपी हे पीडितांच्या ओळखीतील, नातेवाईक किंवा परिचित असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
याच कालावधीत विनयभंगाच्या १४९ घटना नोंदविण्यात आल्या असून, गेल्या काही महिन्यांत या आकड्यात आणखी वाढ झाल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. शहरातील वाढती लोकसंख्या, स्थलांतरितांचे प्रमाण आणि सामाजिक बदल यामुळे गुन्हेगारीचे स्वरूप अधिक गुंतागुंतीचे होत असल्याचेही निरीक्षण नोंदवले जात आहे.गेल्या दोन वर्षांतील आकडेवारी पाहता पुण्यात गंभीर स्वरूपाच्या लैंगिक गुन्ह्यांमध्ये सातत्याने नोंद होत असल्याचे दिसते. २०२४ मधील बोपदेव घाट बलात्कार प्रकरण, २०२५ मधील स्वारगेट बलात्कार प्रकरण तसेच कोंढवा येथील बनावट बलात्कार प्रकरण यांसारख्या घटनांनी शहरात मोठी खळबळ उडवली होती. याशिवाय विनयभंगाशी संबंधित अनेक प्रकरणेही गंभीर स्वरूपाची असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
आकडेवारीनुसार, Pune rape cases २०२५ मध्ये बलात्काराचे २४० गुन्हे नोंदवले गेले असून त्यापैकी बहुतेक प्रकरणांत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. विनयभंगाच्या ६१३ तक्रारींपैकीही मोठ्या प्रमाणात तपास पूर्ण झाला आहे. तर २०२६ च्या सुरुवातीच्या तीन महिन्यांतच ४९ बलात्कार आणि १४९ विनयभंग प्रकरणे नोंदवली गेली असून अनेक प्रकरणे अजून तपासाधीन आहेत.पोक्सो कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांमध्येही लक्षणीय वाढ दिसून येत आहे. जानेवारी ते मार्च २०२६ या कालावधीत ५० बलात्कार पोक्सो प्रकरणे आणि ६६ विनयभंग पोक्सो प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यातील अनेक प्रकरणे अद्याप न्यायालयीन प्रक्रियेत आहेत.दरम्यान, काही घटनांमुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे. एका प्रकरणात पीडितेच्या कुटुंबीयांनी कठोर शिक्षा देण्याची मागणी करत “त्याला फाशीची शिक्षा द्या” अशी भावना व्यक्त केली. अशा घटना समाजव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत असल्याचेही बोलले जात आहे.
इंटरनेटवरील सहज उपलब्ध Pune rape cases असलेले हिंसक आणि विकृत लैंगिक साहित्य, सोशल मीडियाचा अनियंत्रित वापर आणि संवेदनशीलतेचा अभाव ही या वाढत्या गुन्हेगारीमागील प्रमुख कारणे आहेत. काही सायबर प्लॅटफॉर्मवर बंदी असली तरी अनेक वेबसाइट्स अद्याप सक्रिय असल्याचेही समोर आले आहे.पुणे आणि मुंबईसारखी मोठी शहरे आता गुन्हेगारीचे ‘हॉटस्पॉट’ ठरत असल्याचे निरीक्षण नोंदवले जात आहे. वाढते शहरीकरण, बाहेरून होणारे स्थलांतर आणि सामाजिक बदल यामुळे कायदा-सुव्यवस्थेवर ताण वाढत असल्याचेही पोलिस यंत्रणेचे म्हणणे आहे.या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी शाळांमध्ये लैंगिक शिक्षण, पालक-मुलांमध्ये मोकळा संवाद, फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत जलद न्यायप्रक्रिया, तसेच सोशल मीडियाच्या वापरावर अधिक जागरूकता निर्माण करण्याची गरज व्यक्त केली आहे. गुन्हेगारांविरोधात कठोर सामाजिक आणि कायदेशीर भूमिका घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.