नवी दिल्ली,
Rahul Gandhi's dual citizenship controversy काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहून गांधी यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुहेरी नागरिकत्वाच्या प्रकरणानंतर आता त्यांच्याविरोधात कथित बेहिशेबी मालमत्तेबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी होणार आहे. या प्रकरणी १२ मे रोजी पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठासमोर ही याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने पुढील तारखेला दोन्ही बाजूंचे मुद्दे ऐकून याचिका ग्राह्य धरायची की नाही, यावर निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत.

याचिकाकर्त्याने राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबाच्या मालमत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतांच्या तुलनेत मालमत्ता अधिक असल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणात विविध केंद्रीय तपास यंत्रणा आणि सरकारी विभागांनाही पक्षकार करण्यात आले आहे. दरम्यान, राहुल गांधी यांच्याविरोधातील दुहेरी नागरिकत्वाचे प्रकरणही अद्याप न्यायालयात प्रलंबित आहे. याचिकेत त्यांच्याकडे भारतीय आणि ब्रिटिश अशा दोन्ही देशांचे नागरिकत्व असल्याचा आरोप करण्यात आला आहे. भारतीय कायद्यानुसार दुहेरी नागरिकत्वाला परवानगी नसल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे. न्यायालयाने या आरोपांकडे दुर्लक्ष करता येणार नसल्याचे नमूद करत चौकशीची गरज असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.