१२ तास पाण्यात राहून चित्रपट शूटिंग

    दिनांक :07-May-2026
Total Views |
मुंबई
Raja Shivaji सध्या सर्वत्र चर्चेत असलेल्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटातील अनेक दमदार दृश्यांप्रमाणेच एका विशेष पाण्याखालील दृश्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. अभिनेत्री दिशा परदेशी हिने या चित्रपटात अफजल खानाच्या पत्नीची भूमिका साकारली असून तिच्यावर चित्रित करण्यात आलेला मृत्यूचा प्रसंग सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. तब्बल १२ तास पाण्यात राहून हे दृश्य चित्रीत करण्यात आल्याची माहिती समोर आली असून, या अनुभवाबद्दल अभिनेत्रीने सोशल मीडियावर खुलासा केला आहे.
 

Raja Shivaji  
दिशा परदेशीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत या दृश्यामागील मेहनत आणि आव्हानांबद्दल सांगितले. या पोस्टमध्ये तिने म्हटले आहे की, ‘राजा शिवाजी’मधील बहुचर्चित पाण्याखालील दृश्याचा भाग होणे हा तिच्यासाठी अत्यंत खास आणि वेगळा अनुभव होता. अफजल बेगमच्या भूमिकेतून त्या प्रसंगातील वेदना आणि तीव्रता पडद्यावर साकारताना तिला अभिनयाच्या अनेक नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या.या कठीण दृश्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. दिशा परदेशीने सांगितले की, चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेता रितेश देशमुख यांनी संपूर्ण टीमला आधीपासूनच वॉटर सिक्वेन्ससाठी सखोल प्रशिक्षण दिले होते. पाण्याखाली अभिनय करणे, दीर्घकाळ श्वासावर नियंत्रण ठेवणे आणि प्रत्येक शॉटची अचूक तयारी या सर्व गोष्टींचे काटेकोर नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे अत्यंत अवघड असलेला हा सीन सुरक्षित वातावरणात पूर्ण करता आला.
 
 
दिशाने आपल्या Raja Shivaji पोस्टमध्ये रितेश देशमुख आणि संपूर्ण टीमचे विशेष कौतुक केले आहे. सुरक्षेपासून ते शॉट डिव्हिजनपर्यंत प्रत्येक बाबीकडे बारकाईने लक्ष दिल्यामुळे सेटवर आत्मविश्वासाचे वातावरण होते, असे तिने नमूद केले. अशा व्यावसायिक आणि समर्पित टीमसोबत काम करण्याची संधी मिळणे हे भाग्य असल्याची भावना देखील अभिनेत्रीने व्यक्त केली.दरम्यान, ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत असून प्रेक्षकांकडूनही त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटासाठी रितेश देशमुख गेल्या दहा वर्षांपासून प्रयत्न करत होता. अनेक अडचणी आणि अपयशांचा सामना केल्यानंतर अखेर १ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटातील कलाकारांचे अभिनय, भव्य सेट्स आणि तांत्रिक बाजूंचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत असून, विशेषतः पाण्याखालील दृश्याने प्रेक्षकांना अक्षरशः थक्क केले आहे.