आजारातून बरे होताच शरद पवार पुन्हा सक्रिय; पहिला दौरा साताऱ्यात

    दिनांक :07-May-2026
Total Views |
पुणे,
Sharad Pawar राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे अलीकडील आजारपणातून पूर्णपणे बरे झाल्यानंतर पुन्हा एकदा सार्वजनिक आणि राजकीय जीवनात सक्रिय झाले आहेत. काही दिवसांपूर्वी राज्यसभेच्या शपथविधीनंतर त्यांना वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर प्रकृती स्थिर झाल्याने त्यांना घरी विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला होता. आता ते पूर्णपणे बरे होऊन पुन्हा जनसंपर्क आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होत असल्याचे दिसत आहे.
 

Sharad Pawar  
या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचा आजारपणानंतरचा पहिला अधिकृत दौरा सातारा शहरात नियोजित करण्यात आला आहे. पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६७ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहणार आहेत. ८ मे रोजी सायंकाळी ते साताऱ्यात दाखल होतील, तर ९ मे रोजी सकाळी ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन करणार आहेत.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शरद पवार भूषवणार असून रयत शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित या सोहळ्याला शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती अपेक्षित आहे. या वेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान, तसेच ‘रयत मासिक’, ‘कर्मवीर सांगाती’ आणि ‘रयत विज्ञान पत्रिका’ या प्रकाशनांचे अनावरणही त्यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमात शिक्षण Sharad Pawar  आणि समाजसेवेतील उल्लेखनीय योगदानासाठी ‘यशवंतराव चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्कार’ देखील प्रदान करण्यात येणार आहेत. या संपूर्ण सोहळ्याकडे राज्यभरातील राजकीय आणि शैक्षणिक वर्तुळाचे लक्ष लागले असून शरद पवार यांच्या मार्गदर्शनपर भाषणाबाबतही विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.दरम्यान, या दौऱ्यादरम्यान ते कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या ‘प्रतिसंगम’ स्मृतिस्थळाला भेट देणार की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र, आजारपणानंतर दीर्घ विश्रांतीनंतर ते पुन्हा सार्वजनिक व्यासपीठावर येत असल्याने पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला विशेष राजकीय आणि भावनिक महत्त्व प्राप्त झाले आहे.