मुंबई
Simala Prasad, भोपाळ येथे पोलीस उपमहानिरीक्षक (महिला सुरक्षा) म्हणून कार्यरत असलेल्या आयपीएस अधिकारी सिमाला प्रसाद यांनी प्रशासकीय सेवेसोबतच अभिनय आणि लेखन क्षेत्रातही ठसा उमटवण्यास सुरुवात केली आहे. अर्थपूर्ण सिनेमा हा समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगत त्यांनी आता ‘द नर्मदा स्टोरी’ या आगामी चित्रपटात प्रमुख भूमिका स्वीकारली आहे. या चित्रपटात त्या एका सबइन्स्पेक्टरची भूमिका साकारत असून, ही भूमिका समाजात सकारात्मक संदेश देणारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
२०११ बॅचच्या आयपीएस अधिकारी असलेल्या सिमाला प्रसाद यांनी पहिल्याच प्रयत्नात नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करत देशात ५१ वा क्रमांक मिळवला होता. पोलीस सेवेत महत्त्वाची जबाबदारी सांभाळत असतानाच त्यांनी लेखन आणि अभिनय या क्षेत्रांकडेही वळण्याचा निर्णय घेतला. त्यांचे म्हणणे आहे की, योग्य संतुलन राखल्यास व्यावसायिक जबाबदाऱ्या आणि वैयक्तिक आवडी-निवडी एकत्रितपणे जोपासता येतात.
सिमाला प्रसाद याआधी ‘अलिफ’ आणि ‘नक्कास’ या चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र, ‘द नर्मदा स्टोरी’मध्ये त्या प्रथमच मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटात त्या नर्मदा रायकवार नावाच्या सबइन्स्पेक्टरची भूमिका साकारत आहेत. स्वतः पोलीस अधिकारी असूनही पडद्यावर पोलिसाची भूमिका करण्याबाबत सुरुवातीला साशंकता होती, असे त्या सांगतात. मात्र, चित्रपटाच्या कथानकाने आणि पात्राच्या सामाजिक संघर्षाने त्यांना ही भूमिका स्वीकारण्यास प्रेरित केले.
या भूमिकेबाबत बोलताना सिमाला म्हणाल्या की, “एसपी आणि एसआय एकाच विभागात काम करत असले तरी त्यांच्या जबाबदाऱ्या, सामाजिक पार्श्वभूमी, अनुभव आणि आव्हाने वेगवेगळी असतात. नर्मदा रायकवारची भूमिका करताना मला अशा वास्तवाशी जवळून परिचय झाला, जे अधिकारी म्हणून काम करताना कदाचित समजले नसते.”
अभिनय क्षेत्रात Simala Prasad येण्यामागील प्रवासही त्यांनी उलगडला. सिमालाच्या आई पद्मश्री मेहरुन्निसा परवेज या प्रसिद्ध लेखिका आहेत. चित्रपट दिग्दर्शक झैघम इमाम हे त्यांच्या आईला भेटण्यासाठी आले असताना त्यांनी सिमालाला ‘अलिफ’ या चित्रपटात भूमिका करण्याची ऑफर दिली होती. मदरसा आणि आधुनिक शिक्षण या विषयावर आधारित त्या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अभिनयाचे कोणतेही औपचारिक प्रशिक्षण नसतानाही त्यांनी प्रभावी काम केले. त्यानंतर ‘नक्कास’ चित्रपटातही त्यांनी भूमिका साकारली.
लेखन क्षेत्रातही सिमालाने पाऊल टाकले असून यावर्षीच्या सुरुवातीला त्यांचे ‘शी गोज मिसिंग’ हे नॉन-फिक्शन पुस्तक प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात त्यांनी स्वतःचे अनुभव आणि त्यांचे विश्लेषण मांडले आहे. अभिनयासाठी त्यांनी ऑनलाइन कार्यशाळांमधून प्रशिक्षण घेतले असून चित्रीकरणासाठी विशेष परवानगीही घ्यावी लागल्याचे त्यांनी सांगितले.
सिनेमा हा केवळ मनोरंजनाचे साधन नसून सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याचा विश्वास व्यक्त करत सिमाला म्हणाल्या की, “एक अधिकारी म्हणून केलेले काम विशिष्ट क्षेत्रापुरते मर्यादित राहते, मात्र सिनेमा आणि पुस्तकांमधून व्यापक स्तरावर लोकांपर्यंत संदेश पोहोचवता येतो. समाजात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या आणि प्रेरणादायी भूमिका करत राहण्याची माझी इच्छा आहे.”
प्रशासकीय सेवेसोबतच साहित्य आणि चित्रपटसृष्टीत सक्रिय असलेल्या सिमाला प्रसाद यांच्या या नव्या प्रवासाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.