उद्या फुटणार दहावीच्या निकालाचा नारळ! 'या' वेबसाईटवर पाहता येणार गुणपत्रिका

    दिनांक :07-May-2026
Total Views |
मुंबई,
SSS Board 10th Result : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेची प्रतीक्षा आता संपली असून उद्या, ८ मे रोजी दुपारी ठीक १ वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार आहे. राज्य मंडळाने या संदर्भात अधिकृत घोषणा केली असून, राज्यातील सुमारे १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे भवितव्य उद्या स्पष्ट होईल. विद्यार्थ्यांनी आपला निकाल पाहण्यासाठी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांचा वापर करावा. निकाल पाहताना विद्यार्थ्यांनी आपला रोल नंबर आणि आईचे नाव अचूक प्रविष्ट करणे आवश्यक आहे. यंदा बोर्डाने निकाल पाहण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध करून दिले असून, निकाल जाहीर होताच एकाच वेळी सर्व्हरवर येणारा ताण टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी संयम ठेवावा, कारण सुरुवातीला वेबसाईट स्लो होण्याची शक्यता असते.
 

ssc 
 
 
यंदाच्या निकालाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना 'डिजीलॉकर'वरही आपली डिजिटल मार्कशीट सहजपणे उपलब्ध करून देण्यात आली आहे. निकाल पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्याची एक प्रत डाऊनलोड करून किंवा प्रिंट काढून जतन करून ठेवावी, जी पुढील तात्पुरत्या प्रवेश प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल. ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणांबाबत शंका असेल किंवा त्यांना फेरतपासणी करायची असेल, त्यांच्यासाठी गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकेच्या प्रती मिळवण्याची सुविधा निकाल जाहीर झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिली जाणार आहे.
परीक्षेत अपेक्षेप्रमाणे यश न मिळवू शकणाऱ्या किंवा अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा दिलासादायक बातमी आहे. अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी राज्य मंडळ जुलै-ऑगस्ट महिन्यांतच पुनर्परीक्षा घेणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी निकालाच्या गुणांचा कोणताही ताण न घेता सकारात्मक राहावे. उद्या दुपारी १ वाजल्यापासून विद्यार्थ्यांनी निकाल पाहण्यासाठी mahahsscboard.in, sscresult.mkcl.org किंवा डिजीलॉकर यांसारख्या अधिकृत लिंकचा वापर करावा.