वाशीम,
st reservation गोरबंजारा समाजाच्या एस.टी. आरक्षणाच्या मागणी संदर्भात राज्य सरकारने स्थापन केलेल्या अभ्यास समितीने गेल्या पाच महिन्यात नेमके कोणते काम केले, याचा सविस्तर अहवाल समाजासमोर जाहीर करावा, अशी ठाम मागणी गोरसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर जिल्हाधिकारी, तहसीलदार व उपविभागीय अधिकार्यांना निवेदने देण्यात आली. स्थानिक पदाधिकार्यांनी ७ मे रोजी वाशीम जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले.

निवेदनानुसार, गोरबंजारा समाजाला एस.टी. प्रवर्गातून आरक्षण द्यावे. हैदराबाद गॅझेट लागू करावे आदी प्रमुख मागण्यासाठी गेल्या वर्षभरात महाराष्ट्रभर ५५ पेक्षा अधिक भव्य महामोर्चे काढण्यात आले होते. आंदोलनाची तीव्रता वाढत असताना गोरसेनेच्या नेतृत्वाखाली समृद्धी महामार्गावर हजारो गोर सैनिकांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. तसेच नांदेड येथे रेल्वे रोखण्याचाही इशारा देण्यात आला होता. या आंदोलनांची गंभीर दखल घेत ४ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी बंजारा समाजाच्या शिष्टमंडळासोबत सविस्तर चर्चा केली होती. त्यानंतर एस.टी. आरक्षणाच्या मागणीचा अभ्यास करण्यासाठी उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश तहलियानी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष अभ्यास समिती स्थापन करण्यात आली. मात्र, समिती स्थापन होऊन पाच महिने उलटल्यानंतरही समितीने नेमका कोणत्या मुद्यांवर अभ्यास केला, कोणत्या स्तरावर काम सुरू आहे, याबाबत समाजाला कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे समाजात नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून ही समिती केवळ कागदोपत्रीच मर्यादित राहिली आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
गेल्या ७५ वर्षांपासून समाजाकडून एस.टी. आरक्षणाची सातत्याने मागणी केली जात आहे.st reservation या मागणीसाठी राज्यभर लाखोंच्या संख्येने महामोर्चे काढण्यात आले, अनेकांनी आमरण उपोषणे केली, रास्ता रोको आंदोलने करण्यात आली, तर पाच युवकांनी आत्मबलिदान दिले. तरीही शासनाने ठोस निर्णय घेण्यात विलंब केल्याने समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
निवेदन देतावेळी गोरसेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर जाधव , जिल्हा सचिव निलेश राठोड, तालुकाध्यक्ष, तालुका सचिव, समनक जनता पार्टीच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा शितल विष्णू राठोड, महानंदा राठोड, वनिता पवार, सुरेखा राठोड, कल्पना राठोड, किरण राठोड, सेवालाल महाराज संस्थान वाशीम चे नेमीचंद चव्हाण महाराज तसेच पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने गोरसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.