हळदीच्या मांडवात दुःखाचा आक्रोश

    दिनांक :07-May-2026
Total Views |
नवरदेवाच्या भावाचा मृत्यू
 
टाकरखेडा संभू, 
Tushar Akhar  ज्या घरात सनई-चौघड्यांच्या सुरात आनंदाचे वातावरण नांदत होते, जिथे नवरदेवाच्या हाताला हळद लागून लग्नसोहळ्याची लगबग सुरू होती, त्याच घरात नियतीने क्रूर घाला घालत आनंदाचे रूपांतर क्षणात आक्रोशात केले. भातकुली तालुक्यातील रामा येथे आखरे परिवारावर लग्नाच्या पूर्वसंध्येलाच दुःखाचा डोंगर कोसळला. नवरदेव हर्षल सुधाकर आखरे यांचा थोरला भाऊ तुषार सुधाकर आखरे (वय ३५) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
 
 
tushar
 
६ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास हर्षल यांच्या लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम उत्साहात सुरू होता. नातेवाईक, मित्रमंडळी आणि गावकर्‍यांच्या उपस्थितीत मंगलगीते, हास्य-विनोद आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. घरासमोर आकर्षक मांडव सजविण्यात आला होता. मात्र, या आनंदोत्सवाला अचानक दुःखाची किनार लागली. हळदीच्या कार्यक्रमादरम्यान Tushar Akhar तुषार आखरे यांना अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला. कुटुंबीयांनी तातडीने उपचारासाठी धावपळ केली, मात्र उपचार मिळण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. भावाच्या लग्नात फेटा बांधून आनंद साजरा करण्याचे स्वप्न पाहणार्‍या तुषार यांना नियतीने कायमचे हिरावून नेले. सर्वाधिक हृदयद्रावक क्षण तेव्हा ओढवला, जेव्हा लग्नाची मिरवणूक निघण्याची तयारी सुरू असताना त्याच मांडवातून तुषार आखरे यांची अंत्ययात्रा निघाली. नवरदेवाच्या वेशात बोहल्यावर चढण्याऐवजी हर्षल यांना आपल्या लाडक्या भावाच्या पार्थिवाला खांदा द्यावा लागला. हे दृश्य पाहून उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले.
तुषारच्या मागे पत्नी, चार वर्षाची मुलगी, नऊ महिन्याची मुलगी, आई, वडील, भाऊ असा आप्त परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे रामा गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.