शस्त्रसंधी तरीही अमेरिकेचा इराणी जहाजावर हल्ला!

    दिनांक :07-May-2026
Total Views |
वॉशिंग्टन,
US attack on Iranian ship वॉशिंग्टन येथे इराण आणि अमेरिकेमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणखी एक गंभीर घटना समोर आली आहे. अमेरिकन लष्कराने ओमानच्या आखातात एका इराणी तेलवाहू जहाजावर कारवाई केल्याची माहिती पुढे आली असून, त्यामुळे दोन्ही देशांमधील संघर्ष पुन्हा चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेरिकेच्या मध्यवर्ती लष्करी कमांडच्या माहितीनुसार, संबंधित जहाज अमेरिकेने घातलेल्या निर्बंधांकडे दुर्लक्ष करून बंदराच्या दिशेने पुढे सरकत होते. त्यानंतर अमेरिकन लढाऊ विमानाने जहाजाच्या नियंत्रण यंत्रणेला लक्ष्य करत हल्ला केला. या कारवाईनंतर परिसरातील तणाव अधिक वाढला आहे.
 
 

iran 
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कठोर इशारा दिला आहे. त्यांनी सांगितले की, इराणने अमेरिकेच्या अटी मान्य केल्या नाहीत तर मोठ्या प्रमाणावर पुन्हा हवाई हल्ले केले जाऊ शकतात. दोन महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष थांबवण्यासाठी करार आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ट्रम्प यांनी सामाजिक माध्यमांवरील संदेशात म्हटले की, करार झाल्यास युद्धजन्य परिस्थिती कमी होऊ शकते आणि तेल व वायू पुरवठा पुन्हा सुरळीत होण्यास मदत मिळेल. मात्र इराणने तडजोड न केल्यास कारवाई अधिक तीव्र केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. दुसरीकडे, इराण सरकारने अमेरिकेकडून आलेल्या नव्या प्रस्तावांचा अभ्यास सुरू असल्याचे म्हटले आहे. अधिकृत स्तरावर शस्त्रसंधी लागू असली तरी आखाती प्रदेशातील परिस्थिती अजूनही तणावपूर्ण असल्याचे चित्र दिसत आहे.