बहुमताअभावी विजय यांचा शपथविधी लांबणीवर

    दिनांक :07-May-2026
Total Views |
चेन्नई,
Vijay's swearing-in ceremony postponed तामिळनाडू मध्ये नवीन सरकार स्थापनेभोवती मोठी राजकीय घडामोड सुरू असून, अभिनेता-राजकारणी विजय यांच्या शपथविधीबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ पूर्ण न झाल्याने नियोजित शपथविधी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. विजय यांच्या पक्षाकडे स्वतःचे १०७ आमदार असून, त्यांना काँग्रेसच्या काही आमदारांचा पाठिंबा मिळाला आहे. मात्र सरकार स्थापनेसाठी आवश्यक असलेला आकडा अद्याप गाठता आलेला नाही. राज्यपालांकडे आवश्यक पाठिंब्याची पत्रे सादर झाल्यानंतरच सरकार स्थापनेसाठी औपचारिक निमंत्रण दिले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
 
 
Vijay
 
दरम्यान, विजय यांच्या शपथविधीसाठी चेन्नईतील नेहरू मैदानावर तयारी सुरू असतानाच राजकीय समीकरणे अचानक बदलली. बहुमताबाबतची अनिश्चितता वाढल्यानंतर त्यांना देण्यात आलेली सरकारी ताफ्याची सुरक्षा देखील मागे घेण्यात आल्याचे वृत्त आहे. या घडामोडींमध्ये एआयएडीएमके आपल्या आमदारांना पुदुचेरी येथील एका विश्रांतीस्थळी हलवले आहे. पक्षातील काही आमदार विजय यांच्या बाजूने जाऊ शकतात, अशी भीती व्यक्त केली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दुसरीकडे, विजय यांच्या पक्षाकडून इतर प्रादेशिक पक्षांशी पाठिंब्यासाठी चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
 
काँग्रेसने या प्रकरणात राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत, सर्वात मोठ्या पक्षाच्या नेत्याला सरकार स्थापनेची संधी मिळायला हवी, अशी भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे द्रविड पक्षांमध्येही पुढील राजकीय रणनीतीवर बैठका सुरू झाल्या आहेत. विजय यांच्या पक्षाने आपल्या सर्व आमदारांना पक्ष मुख्यालयात बोलावले असून सध्याच्या परिस्थितीवर चर्चा होणार आहे. राज्यातील सत्तासमीकरणे वेगाने बदलत असल्याने पुढील काही तास तामिळनाडूच्या राजकारणासाठी महत्त्वाचे मानले जात आहेत.