कोलकाता,
Violence peaks in Bengal पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून विविध भागांत हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत. तृणमूल काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये अनेक ठिकाणी संघर्ष, दगडफेक आणि गोळीबाराच्या घटना घडत असल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्या स्वीय सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या हत्येनंतर राज्यातील परिस्थिती आणखी चिघळली आहे. अशातच भाजपच्या आणखी एका कार्यकर्त्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील राजीव कॉलनी परिसरात भाजप कार्यकर्ते रोहित रॉय उर्फ चिंटू यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. परिसरात पक्षाचा झेंडा लावण्यावरून दोन गटांमध्ये आधी वाद झाला आणि त्यानंतर परिस्थिती हिंसक बनली.स्थानिकांच्या माहितीनुसार, भाजप कार्यकर्ते परिसरात झेंडा फडकावण्यासाठी गेले असताना काही लोकांनी त्याला विरोध केला. त्यातून जोरदार बाचाबाची आणि धक्काबुक्की झाली. काही वेळातच परिस्थिती हाताबाहेर गेली आणि एका व्यक्तीने रोहित रॉय यांच्यावर गोळीबार केला. गोळ्या लागल्यानंतर ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. स्थानिकांनी तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले.
या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हिंसाचार आणखी वाढू नये यासाठी पोलिसांकडून सतर्कता बाळगली जात आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला असून परिसरातील दृश्यचित्रण फितींची तपासणी केली जात आहे.दरम्यान, भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कार्यकर्त्यांवर अत्याचार होत असल्याचे सांगत त्यांनी कुणीही कायदा हातात घेऊ नये, असे स्पष्ट केले. निवडणुका संपल्या असून आता राज्यात शांतता आणि सौहार्द टिकवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून पश्चिम बंगालमध्ये सतत हिंसक घटना घडत आहेत. संदेशखालीसह अनेक भागांत संघर्ष झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काही ठिकाणी पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दलांवरही हल्ले झाल्याचे वृत्त आहे. आतापर्यंत या हिंसाचारात सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून त्यात चंद्रनाथ रथ यांचाही समावेश आहे.