नवी दिल्ली
WhatsApp जगप्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप हे आयओएस युजर्ससाठी लवकरच एक क्रांतिकारी बदल घेऊन येत आहे. अॅपच्या डिझाइनमध्ये आमुलाग्र बदल करून चॅटिंगचा अनुभव अधिक आधुनिक आणि आकर्षक बनवण्यावर कंपनी सध्या काम करत आहे. सध्या अॅपच्या काही भागांत नवीन लुक दिसत असला, तरी चॅट विंडो उघडल्यावर जुनेच डिझाइन समोर येते. हीच उणीव भरून काढण्यासाठी व्हॉट्सअॅप आता एका अत्याधुनिक इंटरफेसवर काम करत आहे.
WhatsApp काय आहे हे ‘लिक्विड ग्लास यूआय’?
व्हॉट्सअॅपच्या या नवीन डिझाइनला ‘लिक्विड ग्लास यूआय’ असे नाव देण्यात आले आहे. हे डिझाइन प्रामुख्याने पारदर्शक लेयर्स आणि ‘डेप्थ इफेक्ट्स’वर आधारित आहे. या नवीन लुकमुळे अॅपचा इंटरफेस अधिक स्वच्छ आणि प्रीमियम वाटणार आहे. यामध्ये हलके रिफ्लेक्शन आणि अतिशय स्मूद अॅनिमेशनचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे अॅप वापरताना एक वेगळाच अनुभव युजर्सना मिळेल. स्क्रीनवरील प्रत्येक घटक आता बॅकग्राउंडशी एकरूप झाल्यासारखा वाटेल.
WhatsApp चॅट स्क्रीनमध्ये मोठे फेरबदल
या अपडेटचा सर्वात मोठा परिणाम चॅट स्क्रीनवर पाहायला मिळेल. चॅट बार नेहमीप्रमाणे खालीच असेल, पण त्याचे स्वरूप पूर्णपणे बदललेले दिसेल. तो आता एका ‘फ्लोटिंग ग्लास स्ट्रिप’सारखा दिसेल, ज्यातून तुमच्या चॅट वॉलपेपरची अंधुक झलक पाहायला मिळेल. याशिवाय, नेव्हिगेशन बार देखील पारदर्शक केला जाणार आहे, ज्यामुळे खालील मेसेजेस पुसटसे दिसत राहतील. वाचताना डोळ्यांना त्रास होऊ नये, यासाठी यात ’सॉफ्ट फेड इफेक्ट’चा वापर करण्यात आला आहे.