निकालाची प्रतीक्षा संपली, दहावीचा निकाल अखेर जाहीर

    दिनांक :08-May-2026
Total Views |
मुंबई,
10th class results finally declared महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी परीक्षेचा निकाल जाहीर केला असून यंदाही मुलींनी उत्तीर्णतेत आघाडी कायम राखली आहे. राज्याचा एकूण निकाल ९२.०९ टक्के लागला असून मागील वर्षाच्या तुलनेत यामध्ये सुमारे दोन टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे. पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण आणि छत्रपती संभाजीनगर या नऊ विभागीय मंडळांतील लाखो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत निकालाची घोषणा करत विद्यार्थ्यांना सकाळी साडेअकरापासून निकाल पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती दिली. यापूर्वी निकाल दुपारी एक वाजता जाहीर होणार असल्याचे सांगण्यात आले होते, मात्र संकेतस्थळांवर वाढणारी गर्दी लक्षात घेऊन वेळेत बदल करण्यात आला.
 
 
 
10th class results finally declared
यंदाच्या निकालात कोकण विभागाने सर्वाधिक यश मिळवत राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. कोकण विभागाचा निकाल ९७.६२ टक्के इतका लागला आहे. त्यानंतर कोल्हापूर आणि मुंबई विभागांनीही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे ८८.४१ टक्के नोंदवला गेला आहे. लातूर विभागाचाही निकाल तुलनेने कमी राहिला आहे.निकालात मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारली असून मुलींची उत्तीर्णता ९४.९६ टक्के इतकी राहिली आहे. मुलांची उत्तीर्णता ९०.५६ टक्के नोंदवली गेली. राज्यभरातून एकूण १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी १४ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
 
विद्यार्थ्यांना आपला निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांसह विविध ऑनलाइन माध्यमांवर पाहता येणार आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना आपला आसन क्रमांक आणि आईचे नाव प्रविष्ट करावे लागणार आहे. तसेच मोबाईल संदेश सेवेद्वारेही निकाल पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना गुणपत्रिका शाळांमार्फत वितरित करण्यात येणार आहे. दरम्यान, निकालाबाबत शंका असलेल्या विद्यार्थ्यांसाठी गुणपडताळणी, उत्तरपत्रिकेची छायाप्रत आणि पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा मंडळाने उपलब्ध करून दिली आहे. पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्यापूर्वी उत्तरपत्रिकेची प्रत घेणे अनिवार्य करण्यात आले असून विद्यार्थ्यांना निश्चित कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.