दहावीच्या निकालात कोणता विभाग ठरला नंबर वन?

    दिनांक :08-May-2026
Total Views |
मुंबई,
10th class results महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. राज्याचा एकूण निकाल ९२.०९ टक्के लागला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या निकालात सुमारे दोन टक्क्यांची घसरण झाली असली, तरी विद्यार्थ्यांनी समाधानकारक कामगिरी केली आहे. निकाल जाहीर होताच राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली असून अनेक ठिकाणी आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
 
 

10th class results 
यंदाच्या निकालात कोकण विभागाने पुन्हा एकदा राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. कोकण विभागाचा निकाल तब्बल ९७.६२ टक्के लागला असून विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे हा विभाग सर्वाधिक चर्चेत राहिला. कोल्हापूर विभागानेही ९५.४७ टक्क्यांसह दमदार यश मिळवले, तर मुंबई विभागाचा निकाल ९४.९७ टक्के आणि पुणे विभागाचा निकाल ९४.२४ टक्के नोंदवण्यात आला आहे.
 
दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. या विभागाची उत्तीर्णता ८८.४१ टक्के राहिली. लातूर विभागाचाही निकाल ८८.४२ टक्के इतका नोंदवला गेला असून नागपूर विभागाचा निकाल ८९.०७ टक्के राहिला आहे. अमरावती विभागाने ९०.५० टक्के तर नाशिक विभागाने ९०.५३ टक्के निकाल नोंदवला. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी मुलांच्या तुलनेत सरस कामगिरी करत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. मुलींची उत्तीर्णता ९४.९६ टक्के इतकी राहिली असून मुलांची उत्तीर्णता ९०.५६ टक्के नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे यंदाही निकालात मुलींचाच दबदबा कायम राहिल्याचे स्पष्ट झाले आहे.