चंद्रपूर,
chandrapurs mama lake चंद्रपूर जिल्ह्यातील 45 मामा तलावांच्या दुरुस्ती व पुनरुज्जीवनासाठी अंदाजे 15 कोटी 75 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत सहमती दर्शविण्यात आली आहे. राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने, चंद्रपूर जिल्ह्यासह बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील माजी मालगुजारी व इतर तलावांच्या विविध समस्यांबाबत मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील दालनात आयोजित या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
मुनगंटीवार यांनी, बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील तलावांची सद्यस्थिती, तलावांमध्ये मोठ्या प्रमाणावर साचलेला गाळ, दुरुस्तीअभावी घटलेली जलसाठा क्षमता तसेच ग्रामीण भागातील पाणी उपलब्धतेवर होत असलेला परिणाम याबाबत सविस्तर माहिती दिली. जलसंधारणाच्या माध्यमातून शेती, पाणीपुरवठा आणि ग्रामीण विकासाला अधिक गती मिळावी. तसेच तलाव दुरुस्ती व सौंदर्यीकरणाची कामे तातडीने पूर्ण व्हावीत यासाठी आवश्यक निधी व प्रशासकीय मान्यता त्वरित देण्याची मागणी आ. मुनगंटीवार यांनी यावेळी केली.
यावेळी मारोडा तलावाच्या सौंदर्यीकरणाबाबतही सकारात्मक निर्णय घेण्यात आला. तसेच तलाव फुटीच्या आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून आवश्यक दुरुस्ती व संरक्षणात्मक उपाययोजनांसाठी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत निधी उपलब्ध करण्याबाबतही सकारात्मक भूमिका घेण्यात आली. यावेळी लपा तलावाला मामा तलावाशी जोडण्यासाठीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश सचिव जितेंद्र पापळकर यांनी जिल्हाधिकारी यांना दिले.chandrapurs mama lake तसेच संबंधित सर्व प्रस्ताव प्राधान्याने शासनाकडे सादर करून आवश्यक प्रशासकीय मान्यता मिळविण्याबाबत संबंधित अधिकार्यांना सूचना देण्यात आल्या. आगामी जून 2026 अधिवेशनातील व्हाईट बुकमध्ये संबंधित कामांचा समावेश करण्याबाबतही आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. बैठकीला नागपूरचे प्रादेशिक जलसंधारण अधिकारी खटके, प्रकाश पाटील मंत्रालय अधीक्षक अभियंता प्रकाश पाटील तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे चंद्रपूर जिल्हाधिकारी वसुमना पंत, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह सहभागी झाले होते.