अमरावती,
amravati 10th class results इयत्ता दहावीच्या परीक्षेत अमरावती विभाग राज्यात सहाव्या, तर विदर्भात प्रथम स्थानावर आहे. विभागाचा सरासरी निकाल ९०.५० टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तो २.४५ टक्यांनी घसरला आहे. बुलढाणा जिल्हा ९३.९५ टक्के निकालासह विभागात पहिल्या क्रमांकावर आहे. मुलांपेक्षा मुली उत्तीर्ण होण्याचे प्रमाण यंदाही नेहमीप्रमाणे जास्तच आहे.

अमरावती विभागीय मंडळाच्या सचिव प्रीती देशमुख यांनी शुक्रवारी विभागातल्या पाचही जिल्ह्यांच्या निकालाचा तपशील प्रसार माध्यमांसमोर जाहीर केला. दहावीच्या परीक्षेसाठी अमरावती विभागातील १ लाख ६० हजार ३७ विद्यार्थी पात्र ठरले होते. त्यापैकी १ लाख ४४ हजार ८३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात ७४ हजार ५७८ मुले व ७० हजार २५७ मुली आहेत. अनुक्रमे त्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८७.३५ व ९४.०९ टक्के आहे. वाशीम जिल्ह्याचा निकाल ८८.०४ टक्के लागला आहे. या जिल्ह्यातून १९ हजार ७४० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली; पैकी १७ हजार १४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बुलढाणा जिल्ह्याचा निकाल ९३.९५ टक्के लागला आहे. या जिल्ह्यातील ३९ हजार ६७८ विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र होते; त्यापैकी ३७ हजार २८१ उत्तीर्ण झाले. अकोला जिल्ह्याचा निकाल ९०.७४ टक्के लागला आहे. या जिल्ह्यातून २५ हजार ४१६ विद्यार्थी पात्र ठरले होते; त्यापैकी २३ हजार ६४ उत्तीर्ण झाले.amravati 10th class results अमरावती जिल्ह्याचा निकाल ९०.०६ टक्के लागला आहे. या जिल्ह्यातून ३७ हजार ९७४ विद्यार्थी पात्र होते, त्यापैकी ३४ हजार २०३ उत्तीर्ण झाले. यवतमाळ जिल्ह्याचा निकाल ८८.३८ टक्के लागला आहे. या जिल्ह्यातून ३७ हजार ४९९ विद्यार्थी पात्र होते, त्यापैकी ३३ हजार १४४ उत्तीर्ण झाले आहे.
४१,१४९ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत
अमरावती विभागातल्या पाचही जिल्हयांतील ४१ हजार १४९ विद्यार्थी ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेऊन प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. ४८ हजार १४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ४२ हजार २ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, १३ हजार ६७० विद्यार्थी फक्त उत्तीर्ण झाले आहेत.
६२० शाळांचा निकाल शंभर टक्के
अमरावती विभागातल्या पाचही जिल्ह्यातील एकूण ६२० शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. त्यात अकोल्याच्या १०७, अमरावतीच्या १५८, बुलढाण्याच्या १६४, यवतमाळच्या १२९, वाशीमच्या ६२ शाळांचा समावेश आहे.
जिल्हानिहाय टक्केवारी
वाशीम - ८८.०४
बुलढाणा - ९३.९५
अकोला - ९०.७४
अमरावती - ९०.०६
यवतमाळ - ८८.३८