अमरावतीच्या राज्य सेवाहक्क आयुक्तपदी अरुण डोंगरे

    दिनांक :08-May-2026
Total Views |
मंगळवारी मुंबइत घेणार शपथ
अमरावती, 
Arun Dongre राज्य सेवाहक्क आयोगाच्या अमरावती विभागाचे आयुक्त म्हणून म्हाडाचे सेवानिवृत्त मुख्य अधिकारी तथा वरिष्ठ सनदी अधिकारी अरुण डोंगरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सेवाहक्क आयुक्त म्हणून राज्यपालांच्या वतीने आयोगाचे मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव मंगळवार १२ मे रोजी राज्य सेवाहक्क आयुक्त म्हणून त्यांना पद व गोपनीयतेची शपथ देणार आहेत.
 
 
Arun
 
Arun Dongre  मुंबई येथील म्हाडाच्या बिल्डिंग रिपेअर अँड री कन्स्ट्रक्शन बोर्डाचे मुख्य अधिकारी म्हणून अरुण डोंगरे हे सेवानिवृत्त झाल्यानंतर शासनाने त्यांची सेवाहक्क आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. शासकीय सेवेत सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा या सामाजिक बांधीलकीने त्यांनी काम केले असून, शासकीय सेवेची सुरुवात उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मंगरूळपीर येथून झाली आहे. अमरावती विभागात मूर्तिजापूर, दारव्हा, अचलपूर येथे उपविभागीय अधिकारी म्हणून काम केल्यानंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी अमरावती तसेच महसूल उपायुक्त अमरावती व नागपूर या पदावरही काम केले आहे. अमरावती महापालिका आयुक्त म्हणून शहराच्या सर्वांगीण विकासासोबतच ऑनलाईन इमारत परवाना पद्धत लागू केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला घर बांधणीसाठी सुलभपणे परवानगी मिळत आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना स्वच्छ भारत अभियानात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अभिनेते अभिताभ बच्चन यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला होता. यशवंत पंचायतराज अभियानातही त्यांना राज्यात द्वितीय क्रमांक मिळाला आहे. नांदेडचे जिल्हाधिकारी या पदावर काम करताना जलयुक्त शिवार ही योजना अत्यंत प्रभावीपणे राबवली. या योजनेचा राज्यस्तरावर गौरव करण्यात आला. शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे मुख्य कार्याधिकारी तसेच शासनाच्या विविध विभागात त्यांनी यशस्वीपणे सेवा दिली आहे. मुंबई येथील म्हाडाचे मुख्याधिकारी म्हणून त्यांनी चांगले काम केले. त्यांच्या प्रभावी व उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन शासनाने त्यांची अमरावतीचे राज्य सेवाहक्क आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे.