तभा वृत्तसेवा
चंद्रपूर,
chandrapur 10th result महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल 2026 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परिक्षेचा निकाल शुक्रवार, 8 मे रोजी संकेतस्थळावर जाहीर झाला. त्यात, चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल 87.55 टक्के असून, उत्तीर्ण होणार्या मुलींची टक्केवारी 95.99 एवढी आहे. बारावी पाठोपाठ दहावीतही मुलीच आघाडीवर आहेत. मुलांची टक्केवारी 90.04 एवढी आहे. गेल्या काही वर्षांत बारावी असो, की दहावी मुलीच बाजी मारत आहेत.
जिल्ह्यातून पोंभुर्णा तालुक्याचा निकाल सर्वाधिक म्हणजे 93.73 टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल हा चिमूर तालुक्याचा असून, तो 76.80 टक्के इतका आहे. तर चंद्रपूर येथील पॅरामाउंट कॉन्व्हेंट येथील दीक्षिता गाडगे ही 97 टक्के, वरोडा येथील लोकमान्य कन्या विद्यालयाची सानिका ठाकरे 96.80 टक्के, अनुष्का वाणे 95.80 टक्के, तर नवरगाव येथील भारत विद्यालयाचा मानव शेंडे याने 96.60 टक्के गुण प्राप्त करून अगे्रसर आहेत.
जिल्ह्यातून एकूण 28 हजार 214 विद्यार्थ्यांनी परिक्षेसाठी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परिक्षेला 27 हजार 944 विद्यार्थी प्रविष्ट झाले. त्यापैकी 24 हजार 467 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत.chandrapur 10th result चंद्रपूर जिल्ह्याची उत्तीर्णची टक्केवारी 87.55 टक्के आहे. 14 हजार 387 मुले, तर 13 हजार 557 मुली असे एकूण 27 हजार 944 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, 11 हजार 946 मुले, तर 12 हजार 521 मुली, असे एकूण 24 हजार 467 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यात विशेष प्राविण्य प्राप्त श्रेणीमध्ये 5 हजार 916 विद्यार्थी आहेत. जिल्ह्यात विशेष प्राविण्य प्राप्त श्रेणीमध्ये 3 हजार 527 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 7 हजार 904, व्दितीय श्रेणीत 8 हजार 917, तर उत्तीर्ण श्रेणीत 4 हजार 119 विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.
निकालात पोंभुर्णा तालुका आघाडीवर
पोंभुर्णा तालुक्याचा निकाल 93.73 टक्के असून, तो जिल्ह्यात सर्वाधिक आहे. त्या खालोखाल चंद्रपूर 92.92, जिवती तालुका 91.84 टक्के, राजुरा 91.76, गोंडपिपरी 91.24 टक्के, कोरपना 88.55, वरोडा 87.86, ब्रम्हपुरी 87.26, सिंदेवाही 87.11, मूल 87.06, भद्रावती 87.02, बल्लारपूर 85.08, सावली 83.09, नागभीड 80.51, तर चिमूर तालुक्याचा निकाल 76.80 टक्के लागला आहे.