बाळ विक्री प्रकरण

-मुख्य आरोपी डॉ. वाजपेयीसह 10 विरोधात दोषारोपपत्र दाखल! -नर्सिंग होमची मान्यता रद्द, सोनोग्राफी सेंटर सील

    दिनांक :08-May-2026
Total Views |
भंडारा 
baby selling case भंडारा-गोंदिया जिल्ह्यात चांगल्यात गाजलेल्या बाळ विक्री प्रकरणात भंडारा पोलिसांनी मुख्य आरोपी डॉ. नितेश बाजपेयी याच्यासह दहा आरोपींच्या विरोधात दोषारोप पत्र दाखल केले आहे. दरम्यान आतापर्यंत या प्रकरणात कारवाई करताना डॉक्टरचे सोनोग्राफी सेंटर सील करण्यात आले असून न्यू बालाजी नर्सिंग होमची मान्यता रद्द करण्यात आली आहे.
 

baby selling case 
 
उपचाराच्या नावाखाली दाखल करण्यात आलेल्या महिलांच्या बाळांची त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेत लाखो रुपयात विक्री करण्याचा प्रताप गोंदिया येथील न्यू बालाजी नर्सिंग होम चे डॉ. नितेश वाजपेयी यांच्याकडून सुरू होता. हे प्रकरण पहिल्यांदा भंडारा जिल्ह्यात उघडकीस आले. डॉ. बाजपेयी यांच्या विरोधात मोहाडी तालुक्यातील वरठी पोलीस ठाण्यात जानेवारी महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी एक बाळ पोलिसांनी ताब्यात घेतले होते. हा प्रकरणाचा तपास पोलीस अधिक्षक मुरूल हसन यांच्या मार्गदर्शनात साकोलीचे उपविभागीय अधिकारी शिवम विसापुरे यांनी हात घेतला. वेगवेगळ्या दृष्टीने या प्रकरणाचा तपास करून बाळ विक्रीचे हे प्रकरण आणखी उलगडत गेले. प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता पोलिस अधीक्षकांनी तीन सदस्य एसआयटी या प्रकरणाच्या तपासासाठी गठीत केली. उपविभागीय अधिकारी शिवम विसापुरे हेच या समितीचे प्रमुख होते. दरम्यान तपासात डॉक्टरने आणखी दुसरे बाळ विकल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी डिसेंबर 2025 मध्ये विक्री झालेल्या बाळाचाही छडा लावून त्याला ताब्यात घेतले. अटकेपासून वाचण्यासाठी आरोपी डॉ. वाजपेयी याने आत्महत्येचा बनाव करून स्वतःला जखमी करून घेतले होते. परंतु भंडारा पोलिसांपुढे ही चतुराई कामी आली नाही.
 
मुख्य आरोपी नितेश वाजपेयी याला अटक झाल्यानंतर यात अनेक नावे पुढे आली आणि तब्बल दहा जणांना या प्रकरणात पोलिसांनी अटक केली. या दरम्यान भंडारा पोलिसांनी गोंदियाच्या जिल्हा शल्य चिकित्सक आणि आरोग्य विभागाला पत्र पाठवून बाजपेयी याच्या नर्सिंग होम आणि सोनोग्राफी सेंटरवर कारवाई करण्याची विनंती केली होती.baby selling case त्यानुसार 4 मे रोजी डॉ. वाजपेयी याचे न्यू बालाजी सोनोग्राफी सेंटर प्रशासनाने सील केले आहे. तर न्यू बालाजी नर्सिंग होम मान्यता जिल्हा शल्य चिकित्सक गोंदिया यांनी रद्द केल्याचे समजते.
 
अत्यंत गाजलेल्या या प्रकरणात भंडारा पोलिसांनी आता न्यायालयात याचिका दाखल केल्याने लहान बालकांच्या आणि त्यांच्या मातापित्याच्या भावनांचा बाजार मांडणाऱ्या डॉक्टरला कायदेशीर धडा मिळेल, अशी चर्चा सुरु झाली आहे. तीन ते चार लाखात एका बाळाची विक्री करण्याचे हे प्रकरण वैद्यकीय क्षेत्रासाठी लाजिरवाणे असेच आहे.