आयकर भरण्यात ‘कॅप्टन कुल’ अव्व्ल!

    दिनांक :08-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Dhoni tops in income tax payments भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा बिहार-झारखंड विभागातील सर्वाधिक वैयक्तिक आयकर भरणारा ठरला आहे. चालू आर्थिक वर्षातही त्याने सर्वाधिक कर भरत आपले स्थान कायम राखले असल्याची माहिती आयकर विभागाकडून देण्यात आली.रांची येथे आयोजित पत्रकार परिषदेत बिहार-झारखंड विभागाचे प्रधान मुख्य आयकर आयुक्त डी. सुधाकर राव यांनी ही माहिती जाहीर केली. त्यांनी सांगितले की, नियमित आणि मोठ्या प्रमाणात कर भरणाऱ्या नागरिकांमध्ये धोनी सातत्याने आघाडीवर राहिला आहे. मात्र, यावेळी त्याने नेमका किती कर भरला याची आकडेवारी विभागाकडून जाहीर करण्यात आली नाही.
 
 
Dhoni tops in income tax payments
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही धोनीची लोकप्रियता आणि उत्पन्न कायम असल्याचे या आकडेवारीतून दिसून येत आहे. क्रीडा क्षेत्रातील यशानंतर जबाबदार नागरिक म्हणूनही तो अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले.पत्रकार परिषदेत बिहार आणि झारखंडमधील कर संकलनाची माहितीही देण्यात आली. विभागाच्या माहितीनुसार, मागील आर्थिक वर्षात झारखंडमधून सुमारे १२ हजार कोटी रुपयांचा महसूल जमा झाला, तर बिहारचे योगदान सुमारे ८ हजार कोटी रुपये होते. एकूण उद्दिष्टात झारखंडचा वाटा सर्वाधिक असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. राज्यातील औद्योगिक आणि व्यापारी वाढ हे त्यामागील प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात आले.
 
याचबरोबर आयकर विभागाने करचुकवेगिरीविरोधातील कारवाईचाही आढावा मांडला. गेल्या वर्षभरात १२ मोठ्या व्यापारी समूहांवर धाडी टाकण्यात आल्या असून ९० हून अधिक प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. तसेच, देशातील कोट्यवधी पॅनधारकांपैकी अत्यल्प लोक नियमितपणे आयकर विवरणपत्र भरत असल्याची बाबही विभागाने चिंतेची असल्याचे म्हटले आहे प्रधान मुख्य आयकर आयुक्त डी. सुधाकर राव यांनी सांगितले की, महेंद्रसिंग धोनीसारख्या व्यक्ती समाजासमोर सकारात्मक आदर्श निर्माण करतात. क्रीडा क्षेत्रातील मोठे नाव असण्यासोबतच कर भरण्याबाबतची त्यांची शिस्त आणि जबाबदारी इतरांसाठी प्रेरणादायी आहे.