कुत्र्याच्या पट्ट्याने पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला जन्मठेप!

    दिनांक :08-May-2026
Total Views |
दुर्गापूर,
wife-murder : पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथील एका न्यायालयाने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या करणाऱ्या पतीला सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आरोपीने आपल्या पाळीव कुत्र्याच्या पट्ट्याने पत्नीचा गळा आवळून तिचा जीव घेतला होता. या घटनेच्या पाच वर्षांनंतर न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.

wife-murder 
 
 
काय आहे संपूर्ण प्रकरण?
 
ही घटना ५ सप्टेंबर २०२१ रोजी दुर्गापूरमधील कांक्सा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या आडा परिसरात घडली होती. बिप्लब परिदा हा एका सरकारी बँकेत साहाय्यक व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता. तो आपली पत्नी इप्सा प्रियदर्शिनी हिच्यासोबत या भागात भाड्याने राहत होता. बिप्लब मूळचा ओडिशाचा होता, तर इप्साचे माहेर कटक येथे होते.
 
२०१९ मध्ये या दोघांचे लग्न झाले होते, मात्र लग्नानंतर काही काळातच त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद होऊ लागले. घटनेच्या रात्री दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. संतापाच्या भरात बिप्लबने घरातील पाळीव कुत्र्याचा पट्टा काढला आणि त्याने इप्साचा गळा आवळून तिची हत्या केली.
 
 
स्वत:च पोलीस ठाण्यात जाऊन दिली कबुली
पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी बिप्लब स्वत: दुचाकीवरून कांक्सा पोलीस ठाण्यात पोहोचला आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत इप्साचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेला जप्त केला होता.
न्यायालयाचा निकाल
या प्रकरणाचा खटला दुर्गापूर विभागीय न्यायालयात सुरू होता. सरकारी वकील श्राबणी सरकार यांनी सादर केलेले पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबावरून न्यायालयाने बिप्लबला दोषी ठरवले. न्यायालयाने बिप्लबला सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. या निकालानंतर मृत इप्साच्या कुटुंबाला अखेर न्याय मिळाला आहे.