मॉस्को,
Explosion in Russia before Victory Day रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष आणखी तीव्र झाला असून युद्धविरामाच्या घोषणेपूर्वीच मोठ्या हल्ल्यांमुळे तणाव कमालीचा वाढला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर ८ आणि ९ मे रोजी युद्धविराम लागू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय अमलात येण्याच्या अवघ्या काही वेळ आधी युक्रेनकडून रशियावर मोठा मानवरहित विमान हल्ला करण्यात आल्याने परिस्थिती पुन्हा चिघळली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी विजय दिनाच्या संचलनात सहभागी होणाऱ्या परदेशी प्रतिनिधींना सावधगिरीचा इशाराही दिला होता. त्यानंतर झालेल्या हल्ल्यामुळे रशियामध्ये सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क करण्यात आल्या आहेत. या कारवाईनंतर रशिया युक्रेनची राजधानी कीववर मोठा प्रत्युत्तरात्मक क्षेपणास्त्र हल्ला करू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कीवमधील परदेशी दूतावासांनाही खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, दोन्ही देशांतील संघर्ष दिवसेंदिवस अधिक भीषण होत चालला आहे. रशियाने डनिप्रो, ओडेसा, खार्किव आणि कीवसह अनेक शहरांवर मोठ्या प्रमाणात मानवरहित विमाने आणि क्षेपणास्त्रांच्या साहाय्याने हल्ले चढवले आहेत. ऊर्जा प्रकल्प, गॅस केंद्रे आणि निवासी भागांना लक्ष्य करण्यात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याचे वृत्त आहे. युक्रेननेही रशियाच्या सीमावर्ती भागांतील लष्करी तळ आणि तेल शुद्धीकरण केंद्रांवर हल्ले तीव्र केले आहेत. बेलगोरोड, कुर्स्क आणि ब्रायन्स्क या भागांमध्ये अनेक ठिकाणी स्फोट घडल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही देशांकडून सुरू असलेल्या सततच्या हल्ल्यांमुळे युद्ध थांबण्याची शक्यता सध्या तरी दूरच दिसत आहे.