चंद्रपूर,
dr ashok uike चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा आहे. विविध कंपन्या येथे येऊन व्यवसाय करतात. मात्र, ज्या शेतकर्यांच्या जमिनी प्रकल्पासाठी घेतल्या जातात, त्यांनाच वार्यावर सोडत असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रकल्पग्रस्तांचे योग्य पूनर्वसन आणि स्थानिकांना रोजगार देणे हे कंपनीचे कर्तव्य आहे.कंपनीच्या फायद्यापेक्षा शेतकर्यांचे हित महत्वाचे आहे. शेतकर्यांची लूट सहन केली जाणार नाही, असा इशारा राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिला.

अरबिंदो कोल माईन्समुळे प्रभावित बेलोरा, जेना, पानवडाळा व इतर 11 गावांतील पूनर्वसन, भुसंपादन तसेच नागरी समस्यांच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी वसूमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, वरोर्याचे उपविभागीय अधिकारी संदीप भस्के, उपजिल्हाधिकारी अतुल जटाळे (पुनर्वसन) संजय पवार (भुसंपादन), जिल्हा खनीकर्म अधिकारी वसीम सय्यद, तहसीलदार राजेश भांडारकर, अरबिंदो कंपनीचे उपाध्यक्ष संजीवा राव, सहउपाध्यक्ष व्यंकट रेड्डी, सहायक महाव्यवस्थापक रमेश वाकडे व प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
डॉ. उईके म्हणाले, ठराविक वेळेत पूनर्वसन व इतर नागरी समस्यांची सोडवणूक करावी. फसवेगिरी करून व्यवसाय करीत असाल, तर खपवून घेणार नाही. कंपनीत स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे. ज्यांना रोजगार दिला आहे, त्यांची यादी आधारकार्डसह जिल्हा प्रशासनाला सादर करावी.dr ashok uike शेतकर्यांच्या संयमालासुद्धा मर्यादा आहे. त्यामुळे कंपनी शेतकर्यांचे नुकसान करू नये, असे स्पष्ट निर्देश डॉ. उईके यांनी दिले.
...तोवर कंपनीने कोळसा काढू नये
जोपर्यंत पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत कंपनीने कोळसा उत्खनन करू नये. कंपनीने मुख्य मार्ग तोडला आहे. प्रकल्पासाठी जमीन घेत असाल, तर सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे. नोकरीमध्ये स्थानिकांना प्राधान्य दिले पाहिजे, अशी मागणी गावकर्यांनी यावेळी केली.