महिला पोलिसांसाठी ताण-तणाव व्यवस्थापन व जीवन कौशल्य कार्यशाळा

    दिनांक :08-May-2026
Total Views |
गोंदिया, 
Gondia Women Police महिला पोलिस अधिकारी व अंमलदारांनी शारीरिक व मानसिकदृष्ट्या निरोगी राहावे, तसेच कर्तव्य आणि कौटुंबिक जबाबदार्‍यांमध्ये समतोल साधता यावा, यासाठी गोंदिया पोलिस मुख्यालयात ताण-तणावाचे नियोजन व जीवन कौशल्य या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन ५ व ६ मे रोजी येथील प्रेरणा सभागृहात करण्यात आले होते.
 
 
MAHILA
 
Gondia Women Police  गोंदिया पोलिस दलातील महिला अधिकारी व कर्मचार्‍यांवर दैनंदिन सेवेत मोठ्या प्रमाणात मानसिक ताण निर्माण होत असतो. कर्तव्यदक्षता, अनियमित वेळा, सामाजिक अपेक्षा आणि घरगुती जबाबदार्‍या सांभाळताना त्यांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर परिणाम होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबविण्यात आला. पोलिस अधीक्षक गोरख भामरे आणि अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेच्या प्रमुख वक्त्या डॉ. अरुधंती भालेराव यांचे वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक नागेश भास्कर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यशाळेत डॉ. भालेराव यांनी महिला पोलिसांवरील मानसिक दबाव, बदलत्या जबाबदार्‍या, भावनिक आव्हाने आणि अनिश्चित कामकाजाच्या वेळांमुळे निर्माण होणार्‍या ताणतणावावर सविस्तर मार्गदर्शन केले. स्वतःच्या मनाशी संवाद साधणे, ताण ओळखणे आणि सकारात्मक पद्धतीने त्याचे व्यवस्थापन करणे यावर विशेष भर देण्यात आला. विविध खेळ, समूहकृती आणि कृतीयुक्त प्रशिक्षण पद्धतींच्या माध्यमातून तब्बल सहा तासांचे प्रशिक्षण देण्यात आले. नकारात्मकतेतून सकारात्मकतेकडे वाटचाल करण्यासाठी महिला पोलिसांना मानसिकदृष्ट्या सक्षम, आत्मविश्वासी आणि संतुलित बनविण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच भावनिक समतोल, निर्णयक्षमता आणि जीवनकौशल्य विकसित करण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेला जिल्ह्यातील सुमारे १६५ महिला पोलिस अधिकारी व अंमलदारांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पोलिस हवालदार राज वैद्य यांनी केले.