दहावी बोर्ड परीक्षेत गुरुकुलचा शंभर टक्के निकाल कायम
कारंजा घाडगे,
gurukul public school महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या दहावी बोर्ड परीक्षेच्या निकालात गुरुकुल पब्लिक स्कूल, कारंजा घाडगे यांनी यंदाही आपल्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम ठेवत अभूतपूर्व यश संपादन केले आहे. शाळेचा शंभर टक्के निकाल लागला असून तालुका तसेच जिल्हा स्तरावर उल्लेखनीय यश मिळवत गुरुकुल परिवाराने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटविला आहे.
यावर्षी शाळेचा विद्यार्थी सृजल विनोद जाधव याने तब्बल 98.80 टक्के गुण मिळवत वर्धा जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच शाळेतीलच विद्यार्थिनी अक्षरा राजेंद्र इंगळे हिने 98.40 टक्के गुण मिळवत वर्धा जिल्ह्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात प्रथम आणि द्वितीय असे दोन्ही मानाचे क्रमांक एकाच शाळेने मिळवत गुरुकुल पब्लिक स्कूलने इतिहास रचला आहे.
शाळेतील एकूण 66 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. विशेष बाब म्हणजे सर्व 66 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असून त्यापैकी तब्बल 25 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसरातून शाळेच्या गुणवत्तेचे कौतुक होत आहे.
जिल्ह्यात प्रथम आलेला सृजल जाधव हा इयत्ता पाचवीपासून गुरुकुल पब्लिक स्कूलचा विद्यार्थी आहे. त्याचे वडील विनोद जाधव हे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक असून आई गृहिणी आहेत. त्याचा धाकटा भाऊ सुद्धा गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता सातवीत शिक्षण घेत आहे. अभ्यासाबरोबरच सृजलला विविध पुस्तके वाचन आणि वक्तृत्वाची विशेष आवड असून भविष्यात प्रशासकीय अधिकारी बनून देशसेवा करण्याचे त्याचे स्वप्न आहे.
तसेच जिल्ह्यात द्वितीय आलेली अक्षरा इंगळे हिचे वडील वीज वितरण कंपनीमध्ये कार्यरत असून आई गृहिणी आहेत. अक्षरालाही वाचनाची विशेष आवड असून भविष्यात प्रशासकीय सेवेत जाऊन देशसेवा करण्याची तिची इच्छा आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना गुरुकुल पब्लिक स्कूलच्या पदाधिकाऱ्यांचे, मुख्याध्यापकांचे व सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल पालकांनी संस्थेच्या सर्व पदाधिकारी आणि शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
गुरुकुल पब्लिक स्कूलने केवळ निकालातच नव्हे तर विज्ञान प्रदर्शनी, शैक्षणिक स्पर्धा, क्रीडा स्पर्धा तसेच विविध उपक्रमांमध्ये जिल्हा व विभागीय स्तरावर सातत्याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.gurukul public school विशेष म्हणजे 2017 पासून शाळेचा सलग शंभर टक्के निकाल लागण्याची गौरवशाली परंपरा यंदाही कायम राहिली आहे.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरातून गुरुकुल पब्लिक स्कूलच्या विद्यार्थी, पालक, शिक्षक व संस्थेचे अभिनंदन करण्यात येत आहे.