‘निधी’ मालमत्तेचा लिलाव कधी..?

    दिनांक :08-May-2026
Total Views |
अनेकांच्या कष्टाचे पैसे अडकलेत
जनसंघर्ष अर्बन निधी घोटाळा प्रकरण
21 मालमत्ता, 35 बँक खाती गोठवली

अभय इंगळे
दिग्रस, 
Jansangharsh Urban Fund Scam Case येथील जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड या संस्थेतील आर्थिक फसवणूक प्रकरणातील आरोपींच्या जवळजवळ 21 स्थावर मालमत्ता, 10 चारचाकी व दुचाकी वाहने आणि 35 बँक खाते गोठविण्यात आले आहेत. या मालमत्तेचा लिलाव तातडीने करून आम्हाला परतावा द्या या मागणीने जोर धरला आहे. मास्टरमाईंड प्रणीत देवानंद मोरे, साहिल अनिल जयस्वाल, प्रीतम देवानंद मोरे, देवानंद लक्ष्मण मोरे, जयश्री देवानंद मोरे, अनिल रामनारायण जयस्वाल, पुष्पा अनिल जयस्वाल यांच्यासह आलमगीर खान आणि नूरमोहंमद खान यांना पोलिसांनी अटक करून कसून चौकशी केली.
 
 
arban
 
यात त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर असलेली कोट्यवधींची मालमत्ता समोर आली आहे. घोटाळेबाज मोरे कुटुंबाच्या तब्बल 13 मालमत्ता जप्त करण्यात आल्या. यात प्रणीत 7, देवानंद 3, प्रीतम, शिवानी आणि पवन मोरे यांच्या प्रत्येकी 1, अशा एकूण 13, तर आलमगिर खान 4, नूरमहमद खान 2, मेहमूदखान, मोहंमद अदनान मो. सादिक परसुवाले यांची प्रत्येकी 1, अशा 21 मालमत्तांचा समावेश आहे.
 
 
Jansangharsh Urban Fund Scam Case  गुंतवणूकदारांची रक्कम परत मिळवून देण्याच्या उद्देशाने, पोलिसांनी या सर्व मालमत्तांच्या लिलावासाठी 1 हजार 720 पानांचा एक प्रस्ताव तयार केला होता. पोलिस अधीक्षक कुमार चिंता, जिल्हाधिकारी विकास मीना यांच्यामार्फत हा प्रस्ताव जुलै 2025 मध्ये शासनाकडे मंजुरीकरिता पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाचा जिल्हा पोलिस दलाकडून सातत्याने पाठपुरावा केल्या जात होता. दरम्यान, गृह विभागाने अधिसूचना काढून मालमत्ता जप्त करण्यासह बँक खाती गोठविण्याच्या आदेशाला मंजुरी दिली. घरे, दुकाने, वाईन बार आणि मोकळे भूखंड आदींचा समावेश आहे. आरोपींच्या नावावरची विविध बँकांमधील एकूण 35 बँक खाती पोलिसांनी गोठवली असून 10 चारचाकी आणि दुचाकी वाहने आरटीओ मूल्यांकनासह जप्त केली.
 
 
मोठ्या प्रमाणात मालमत्ता जप्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे. जनसंघर्ष अर्बन निधी प्रकरणाला 17 महिने उलटून गेले. लोकांच्या कष्टाचे पैसे अडकून पडले आहेत. दरम्यान कारवाई झाली, सर्व आरोपींना अटकही झाली मग परतावाला इतका विलंब का असा प्रश्न आहे. 6 हजार 200 खातेदारांचे 44 कोटी रुपये जनसंघर्ष अर्बन निधीत अडकून पडले आहेत. अगदी भरदिवसा लोकांच्या कष्टाचे पैसे आरोपींनी लुटले. वास्तविक, आज बँकेच्या नियमाने 1 लाखावर 12 हजार रुपये व्याज मिळाले असते. किमान आमची मुद्दल रक्कम तरी द्या, असे खातेदार बोलत आहेत.