कुस्ती, खो-खोमध्ये महावितरण संघाला विजेतेपद

    दिनांक :08-May-2026
Total Views |
-विद्युत कंपन्यांची राष्ट्रीय स्पर्धा

नागपूर, 
Mahavitaran Team Winner पुणे येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये सुरू असलेल्या अ.भा. विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या 47 व्या राष्ट्रीय स्पर्धेत महावितरणने कुस्तीच्या 10 वजन गटांमध्ये 5 सुवर्ण व 2 रौप्य पदकांची कमाई करीत सांघिक विजेतेपद, खो-खो संघाने एकतर्फी वर्चस्व ठेवत विजेतेपद पटकावले. बास्केटबॉलच्या अंतिम लढतीत पंजाब संघाने बाजी मारली.
 
 
maha
 
एमएसईबी होल्डिंग कंपनीद्वारे आयोजित या राष्ट्रीय स्पर्धेत शुक्रवारी कुस्तीच्या 10 वजनगटामध्ये शुक्रवारी (दि. 8) अंतिम सामने झाले. यात विविध वजनगटानुसार अनुक्रमे विजेते व उपविजेते पुढीलप्रमाणे. 57 किलो- 1) सुदर्शन पाटील (महावितरण) व जर्नेलसिंग (हिमाचल प्रदेश), 61 अश्विन मोरे (महावितरण) व सुरेश कुमार (हरियाणा), 65 किलो- राजकुमार काळे (महावितरण) व अजय कुमार (हिमाचल प्रदेश), 70 किलो- रणवीरसिंग (पंजाब) व आनंद नागरगोजे (महावितरण), 74 किलो- सुखबीरसिंग (हिमाचल प्रदेश) व नरेंदरसिंग (पंजाब), 79 किलो- अखिल मुजावर (महावितरण) व शेरोसिंग (पंजाब), 86 किलो- अजय कुमार (हिमाचल प्रदेश) व दीपक (राजस्थान), 92 किलो- बलवीरसिंग (हिमाचल प्रदेश) व अरूण गौड (हरियाणा), 97 किलो- अमोल गवळी (महावितरण) व मदन (हरियाणा), 125 किलो- विजेंदरसिंग (हिमाचल प्रदेश) व प्रमोद ढेरे (महावितरण).
 
 
Mahavitaran Team Winner  महावितरण विरुद्ध हरियाणा पॉवर संघामध्ये खो-खोची अंतिम लढत झाली. यात भारतीय खो-खो संघाचा कर्णधार प्रतिक वाईकर याच्यासह निशिकांत शिंदे, विराज कोटमकर, महेंद्र पाटील यांनी महावितरणच्या आक्रमण व संरक्षणामध्ये आक्रमकता कायम ठेवली व हरियाणा पॉवर संघाचा दोन गुण व एक डाव राखून एकतर्फी विजय मिळवला. कबड्डीमध्ये महावितरणने अंतिम फेरीत प्रवेश केला असून तुल्यबळ व मागील विजेता हिमाचल प्रदेशशी लढत होणार आहे. महावितरणने बीएसईएस दिल्ली संघाचा 36 विरुद्ध 10 असा एकतर्फी पराभव करीत अंतिम फेरी गाठली. हिमाचल प्रदेशने हरियाणा पॉवर संघाचा 48 विरुद्ध 28 असा पराभव करीत अंतिम फेरीमध्ये महावितरणला आव्हान दिले आहे.
 
 
बास्केटबॉलच्या अंतिम सामन्यात पंजाब संघाने (45) हरियाणा संघाला (30) 15 गुणांनी विजय मिळवत स्पर्धेतील विजेतेपद मिळवले. पंजाबकडून हरप्रित सिंग यांनी संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तृतीय स्थानासाठी अत्यंत चुरशीच्या व शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा निर्माण झालेल्या बास्केटबॉलच्या लढतीत महावितरण संघाने (23) राजस्थान संघाचा (21) केवळ 2 गुणांनी पराभव केला. महावितरणकडून भारत मराठे यांनी शेवटच्या क्षणाला दोन गुणांची कमाई करीत संघाला विजयी केले. या लढतीत कृष्णा लाड, किशोर सपकाळे यांनीही चमकदार कामगिरी केली.