पाणीपुरवठा आहे खंडीत, नागरिकांची प्रतीक्षा
नांदगाव पेठ,
Nandgaon water supply disrupted नांदगाव पेठ एमआयडीसी परिसरातील माहुली जहागीरजवळ गुरुवारी सकाळी अप्पर वर्धा जलाशयाची १५०० मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी अचानक फुटल्याने एकच खळबळ उडाली होती. प्रचंड दाबामुळे पाण्याचे उंच फवारे हवेत उसळत होते. काही क्षणांतच परिसर जलमय होऊन लाखो लिटर पाणी वाया गेले. घटनेची माहिती मिळताच जीवन प्राधिकरणचे अभियंता, अधिकारी आणि कर्मचारी यांनी तातडीने उपाययोजना करण्यास सुरुवात केली. युद्धपातळीवर दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ झाल्यानंतर गळती रोखण्यास यंत्रणेला अखेर यश मिळाले.
ही जलवाहिनी अमरावती शहरासह एमआयडीसी परिसरासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे रात्रीपासूनच युद्धपातळीवर दुरुस्ती मोहीम हाती घेण्यात आली. जेसीबी, पोकलेन, क्रेन व इतर यंत्रसामग्रीच्या सहाय्याने मोठे उत्खनन करण्यात आले. फुटलेल्या पाईपचा अचूक भाग शोधण्यासाठी कर्मचार्यांना मोठी कसरत करावी लागली. दरम्यान, सतत वाहणारे पाणी, चिखल आणि पाईपमधील प्रचंड दाब यामुळे दुरुस्तीच्या कामात अनेक अडथळे निर्माण होत होते. काही वेळ तर कामगारांना पाण्याच्या प्रवाहात उतरून काम करावे लागले. जीव धोक्यात घालून कर्मचारी आणि तांत्रिक पथकाने अखंड प्रयत्न सुरू ठेवले. अनेक तासांच्या मेहनतीनंतर अखेर सायंकाळपर्यंत गळती थांबवण्यात यश आले.
Nandgaon water supply disrupted मात्र, जलवाहिनीतील दाब पूर्णपणे पूर्ववत करण्यासाठी तसेच संपूर्ण यंत्रणा सुरळीत सुरू होण्यासाठी आणखी वेळ लागणार असल्याची माहिती संबंधित अधिकार्यांनी दिली. त्यामुळे नांदगाव पेठ एमआयडीसी परिसरासह अमरावती शहरातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. सध्या गळती नियंत्रणात आली असली तरी संपूर्ण पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार असल्याने नागरिकांना पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.