निदा खान अटकेचे 'इनसाईड' डिटेल्स; त्या घरात नेमकं काय घडायचं?

    दिनांक :08-May-2026
Total Views |
छत्रपती संभाजीनगर,
nashik-tcs-case : नाशिकच्या टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, यातील मुख्य आरोपी निदा खान अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या निदाला नाशिक गुन्हे शाखा आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संयुक्त मोहिमेद्वारे संभाजीनगरमधील कौसर पार्क परिसरातून ताब्यात घेतले. तिच्या अटकेनंतर आता ती ज्या ठिकाणी लपून बसली होती, त्या घराबाबत अत्यंत धक्कादायक माहिती समोर येत आहे.
 
 
nashik-tcs-case
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, निदा खान या परिसरात स्वतःची खरी ओळख लपवून आणि नाव बदलून अत्यंत गुप्तपणे राहत होती. कौसर पार्क परिसरात मोठ्या प्रमाणात भाडेकरू राहत असल्याने आणि लोक एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्यात फारसा हस्तक्षेप करत नसल्याने, तिने लपण्यासाठी या भागाची निवड केली होती. स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, हे घर गेल्या सात-आठ महिन्यांपासून रिकामे होते. घराच्या मूळ मालकाने ते विकल्यानंतर तिथे नक्की कोण राहायला आले, याची शेजाऱ्यापाजाऱ्यांनाही पुसटशी कल्पना नव्हती.
 
परिसरातील नागरिकांनी सांगितले की, निदा राहत असलेल्या घराचा दरवाजा नेहमी आतून बंद असायचा. त्या घरात नक्की कोण आणि किती लोक राहतात, हे कधीच कोणाला समजले नाही. केवळ एक वयस्कर व्यक्ती अधूनमधून दूध किंवा किराणा सामान घेण्यासाठी घराबाहेर पडताना दिसायचा. ही मंडळी केवळ चार-पाच दिवसांपूर्वीच तिथे राहायला आली असावीत आणि त्यांनी कोणालाही संशय येऊ नये याची पूर्ण काळजी घेतली होती. मात्र, पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तिचा पत्ता शोधून काढला आणि काल रात्री तिला ताब्यात घेतले.
 
नाशिकमधील या प्रकरणात आतापर्यंत नऊ गंभीर गुन्हे दाखल झाले असून राज्य सरकारने या तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) नेमले आहे. निदा खानच्या अटकेमुळे आता या संपूर्ण रॅकेटचे धागेदोरे कोणापर्यंत पोहोचतात आणि यामध्ये आणखी कोणत्या मोठ्या व्यक्तींचा सहभाग आहे, याचा तपास पोलीस वेगाने करत आहेत. आगामी काळात या प्रकरणातून आणखी काही खळबळजनक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.